पीटीआय, नवी दिल्ली

केंद्र सरकार आणत असलेल्या वक्फ (सुधारणा) विधेयकाविरोधात ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) दिल्लीत आयोजित केलेल्या निदर्शनांना अनेक खासदारांनी हजेरी लावली. हे विधेयक आणण्यामागे देशातील शांततेत व्यत्यय आणणे हा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा हेतू असल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असादुद्दीन ओवैसी यांनी केला.

यावेळी ओवैसी यांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्ष, संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास गट) यांना इशारा दिला की, हे विधेयक मंजूर झाले तर मुस्लीम त्यांना कधीही माफ करणार नाहीत. या विधेयकाला पाठिंबा देऊ नका असे आवाहन त्यांनी या पक्षांना केले. जंतर-मंतर येथे झालेल्या या धरणे निदर्शनांना अनेक मुस्लीम संघटना आणि विचारवंतांनी हजेरी लावली.

‘‘या विधेयकाच्या माध्यमातून मुस्लिमांच्या मशिदी, दर्गे आणि कब्रस्तान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही चंद्राबाबू नायडू, पासवान आणि नितीश कुमार यांना सावधगिरीचा इशारा देत आहोत; लक्षात ठेवा, तुम्ही या महत्त्वाच्या क्षणी या विधेयकाला पाठिंबा दिला तर मुस्लीम तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत,’’ असे ओवैसी म्हणाले.

इतर धर्मीयांना ज्याप्रमाणे त्यांच्या धार्मिक संस्थांवर अधिकार आहे त्याचप्रमाणे वक्फच्या माध्यमातून मुस्लिमांना अधिकार दिला जातो. जर प्रत्येक धर्माला आपापल्या संस्थांच्या प्रशासनाचा अधिकार आहे तर मुस्लिमांना वेगळे का काढले जात आहे असा प्रश्न जमात-ए-इस्लामी हिंदचे अघ्यक्ष सय्यद सदातुल्ला हुसैनी यांनी विचारला.

जनतेमध्ये मंदिर-मशिदीच्या मुद्द्यावर भांडण लावून देणे हा पंतप्रधानांचा हेतू आहे. वक्फ मालमत्तांचे संरक्षण हा या विधेयकाचा हेतू नाही. – असादुद्दीन ओवैसी, प्रमुख, ‘एआयएमआयएम’

विरोधकांकडून मुस्लिमांची दिशाभूल भाजप

वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत असा दावा भाजपने केला. वक्फ बोर्डाच्या मालमत्तांना कोणताही धोका नाही असे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले. विधेयकाला मंजुरी मिळाली तर मालकीहक्क स्पष्ट असलेल्या वक्फच्या मालमत्तांपैकी एक इंचही जागा काढून घेतली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

Story img Loader