बीजिंग : करोनाच्या ताज्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या कठोर टाळेबंदीविरोधात चीनमध्ये जनक्षोभ उसळला असून रविवारी अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाबद्दल हजारो नागरिकांनी घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने केली. आंदोलनाचे हे लोण राजधानी बीजिंग आणि नानजिंग शहरांतील विद्यापीठांच्याही परिसरात पोहोचले आहे.
शांघायमध्ये हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले आहेत. तेथील शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. क्षिनजियांग प्रांताची राजधानी उरुमकी या शहरात शनिवारच्या तीव्र निदर्शनानंतर रविवारीही नागरिक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरल्याचे समाजमाध्यमांवरील चित्रफितींमध्ये दिसले. याच शहरात गुरुवारी एका करोना प्रतिबंधित संकुलाला आग लागून दहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून तेथील परिस्थिती संवेदनशील बनली आहे.
उरूमकी येथे कडेकोट पोलीस बंदोबस्ताला न जुमानता नागरिक सलग दुसऱ्या दिवशी, रविवारी रस्त्यावर उतरले. निदर्शने करणाऱ्या नागरिकांची संख्या दुपारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे ‘बीबीसी’च्या वृत्तात म्हटले आहे. तसेच शांघायमधील निदर्शनांच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या असून त्यांत ‘अध्यक्ष जिनपिंग, स्टेप डाऊन’ आणि ‘कम्युनिस्ट पार्टी, स्टेप डाऊन’ अशा घोषणा दिल्या जात असल्याचे दिसत आहे.
अनेक मोठय़ा विद्यापीठांच्या संकुलांमध्येही आंदोलन पसरले आहे. तेथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चित्रफितीही समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. मोठय़ा शहरांमध्ये शेकडो निदर्शकांना अटक करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षांत सरकारविरोधात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर रोष व्यक्त होत असल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.
धोरण अपयशाविरोधात संताप?
वरवर टाळेबंदीविरोधी वाटणाऱ्या या आंदोलनाने राजकीय वळण घेतले आहे. चीनमध्ये गेल्या काही वर्षांत प्रथमच नागरिक सरकारविरोधी रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारची करोना प्रतिबंधक धोरणे अपयशी ठरल्याने आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्था मंदावण्यावर झाल्याने नागरिकांमध्ये खदखदणारा संताप व्यक्त झाल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
आंदोलनाचे लोण विद्यापीठांपर्यंत : आंदोलनाचे लोण अनेक मोठय़ा विद्यापीठांच्या संकुलांमध्येही पसरले आहे. तेथे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. तर मोठय़ा शहरांमध्ये आंदोलन करणाऱ्या शेकडो निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.
रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ
* चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार चीनमधील करोना रुग्णसंख्या ३९,५०१ वर. त्यापैकी ३५,८५८ रुग्ण लक्षणेविरहित.
* राजधानी बीजिंगमध्ये अनेक इमारती प्रतिबंधित, रविवारी ४,७०० हून अधिक रुग्णांची नोंद. आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ९,६९४ वर