श्रीलंकेत सध्या आर्थिक संकटामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. या आर्थिक संकटामध्ये सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने आता सरकारविरोधातील संतापामुळे लोकांनी रस्त्यांवर उतरुन आंदोलन करण्यास आला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केलीय. गुरुवारी रात्री उशीरा येथील स्थानिकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केलं.
मोठमोठ्याने घोषणाबाजी करत राष्ट्रपतींनी राजानीमा द्यावा अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रपतींनी पदावरुन पायउतार व्हावं या मागणीसाठी पाच हजारहून अधिक लोक श्रीलंकेची राजधानी असणाऱ्या कोलंबो शहरामध्ये रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळालं. हे आंदोलन रोखण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स आणि अर्धसैनिक दलाचा वापर करण्यात आला. या ठिकाणी सध्या कर्फ्यु लावण्यात आलाय. या प्रकरणी ४५ जणांना अटक करण्यात आलीय.
श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांत तेथील आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची झालीय. देशामध्ये मागील अनेक आठवड्यांपासून खाद्यपदार्थांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर, ईंधन आणि गॅसचा तुटवडा अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल मिळत नव्हतं.
कोलंबोमध्ये पोस्टर दाखवत आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आणि त्यातूनच हिंसा सुरु झाली. जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक सुरु केली. पोलिसांनी आश्रूधुराबरोबरच पाण्याचा मारा करुन आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. याच गोंधळासंदर्भात समोर आलेल्या एका व्हिडीओत आंदोलनकर्त्यांनी बाईकवरुन जाणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अडवून त्यांची कोंडी केल्याचं दिसत आहे. लोकांनी एका बसलाही आग लावली. राष्ट्रपतींच्या घरासमोर हा सारा गोंधळ सुरु असताना ते स्वत: मात्र घरी नव्हते.
डिझेल नसल्याने १३ तासांहून अधिक काळ श्रीलंकेत ब्लॅकआऊट होता. रस्त्यांवर गाड्या अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच होत्या. वीज पुरवठा खंडित करण्याचा परिणाम सरकारी रुग्णालयांवरही पडला. याच रुग्णालयांनी काही दिवसांपूर्वी औषधांच्या कमतरतेचं कारण देत शस्त्रक्रीया थांबवल्या होत्या. कोलंबो स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंगही केवळ अर्धा ते दोन तासामध्ये गुंडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अत्यावश्यक सेवेत काम न करणाऱ्यांनी ऑफिसला न जाता घरीच थांबवे असे सांगण्यात आळेय. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार वीज वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पथदिवेही बंद करण्यात आलेत.
राष्ट्रपतींच्या घरासमोर झालेल्या आंदोलनामध्ये लोकांनी रस्ता अडवून धरला. लोकांनी राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रपतींचे ज्येष्ठ बंधू महिंद्रा राजपक्षे पंतप्रधान म्हणून काम करतात. तर सर्वात धाकटे बंदू तुलजी राजपक्षे हे अर्थ विभागाचं काम पाहतात. सर्वात मोठे बंधू चलम राजपक्षे हे कृषी मंत्री आहेत. तर पुतण्यात नमल राजपक्षे हे क्रीडा मंत्री आहेत.