नवी दिल्ली : अतोनात हिंसा आणि अमानुष पुरुषी प्रवृत्तीचे समर्थन करणाऱ्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाविरोधात गुरुवारी संसदेतही सूर उमटले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असला तरी, त्याविरोधात गुरुवारी संसदेत काँग्रेसच्या महिला खासदार रंजिता रंजन यांनी हल्लाबोल केला. ‘माझ्या मुलीची मैत्रिण सिनेमा बघत असताना रडत-रडत बाहेर निघून गेली. महाविद्यालयीन मुलगी असह्य होऊन सिनेमा अध्र्यावर सोडून जात असेल तर हा सिनेमा महिलांबद्दल कोणती भावना ठेवतो हे स्पष्ट होते’, असा मुद्दा रंजन यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात मांडला.

‘अ‍ॅनिमल वा कबीर सिंह यासारख्या चित्रपटांनी नकारात्मक भावनांचे, हिंसेचे, महिलांचा निकृष्ट दर्जाची वागणूक देण्याचे आणि त्यांचा अपमान करण्याचे बेभान समर्थन केले आहे. त्या विरोधात भूमिका घेण्याची गरज आहे’, असे रंजिता रंजन म्हणाल्या. अ‍ॅनिमल किंवा कबीर सिंह अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड प्रोत्साहन कसे देऊ शकते, असा प्रश्न रंजन यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>>वादळग्रस्त तमिळनाडूला ४५० कोटींचा दुसरा हप्ता; मदतीचा दुसरा हप्ता देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश : राजनाथ

धार्मिक भावनाही दुखावल्या!

अ‍ॅनिमलमध्ये ‘अर्जुन वेल्ली ने जोर के.. ’ हे गाणे असून त्याचा संदर्भ हरिसिंह नलवा यांच्याशी आहे. गुरु गोविंद सिंह यांनी मोघलांविरोधात संघर्ष केला, तेव्हा हरीसिंह नलवा सेनापती होते. या गाण्यामुळे  शीखांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका रंजिता रंजन यांनी केली.

Story img Loader