वेगळ्या तेलंगणाच्या मुद्द्यावरून बुधवारी राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. तेलगू देसम पक्षाचे खासदार सी. एम. रमेश यांनी राज्यसभेचे महासचिव शमशेर शेरीफ यांना धक्काबुक्की करीत त्यांच्याकडून कागद ओढण्याचा प्रयत्न केल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले.
आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्य निर्मितीचे विधेयक लोकसभेमध्ये मंगळवारी मंजूर झाले. त्यानंतर याच विधेयकावरून राज्यसभेत तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी महासचिवांना लोकसभेकडून आलेला संदेश वाचून दाखविण्यास सांगितला. हा संदेश अर्थातच आंध्र प्रदेश विभाजन विधेयकाबद्दल असल्याचे लक्षात आल्यावर तिथेच घोषणा देत असलेल्या रमेश यांनी महासचिवांकडून तो कागद ओढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महासचिवांना धक्काबुक्कीही झाली. यानंतर त्याच पक्षाचे वाय. एस. चौधरी यांनी लोकसभेत काल घडलेला प्रकार म्हणजे लोकशाही आहे का, असा प्रश्न उपाध्यक्षांना विचारण्यास सुरुवात केली. समाजवादी पक्षाचे नेते नरेश आगरवाल यांनी लोकसभेत मंगळवारी ज्या पद्धतीने हे विधेयक मंजूर करण्यात आले. ती लोकशाहीची हत्याच असल्याचा आरोप केला.
राज्यसभेत हा गोंधळ सुरूच राहिल्यामुळे उपाध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. दोन वाजता कामकाज सुरू झाल्यावर रमेश यांनी घडल्याप्रकाराबद्दल सभागृहाची माफी मागितली. त्यानंतर उपाध्यक्षांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे स्पष्ट केले.

Story img Loader