मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर सलग तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त केला जात असला तरी काही विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आल्याने पक्षात मोठय़ा प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पिपारिया, विदिशा, नरसिंहगड, भांदर, करेरा, तारणा, पाननगर, पिछोर, शमसाबाद, खातेगाव, मंधाता आणि सेओनी माळवा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करून काही विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यास ठाम विरोध दर्शविला.
पक्षाच्या मुख्यालयात निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या जनाशीर्वाद यात्रेदरम्यान ठिकठिकाणी फलक फडकावून आणि घोषणाबाजी करून काही विद्यमान आमदारांविरुद्ध नाराजी व्यक्त केली.
 सेओनी माळवा मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि राज्याचे वनमंत्री सरताजसिंग यांच्याऐवजी अन्य उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी केली.
माजी केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन आणि राज्याचे उद्योगमंत्री कैलास विजयवर्गीय यांच्यातील मतभेद विकोपाला पोहोचल्याचीही जोरदार चर्चा आहे. या पक्षांतर्गत कुरबुरींबाबत राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांना विचारले असता त्यांनी भाजप हा लोकशाहीवादी पक्ष असून त्यामध्ये प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली की सर्व स्थिती सुरळीत होईल, असेही ते म्हणाले.