भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक जी २० शिखर परिषदेसाठी सपत्नीक भारतात आले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी आज दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही उपस्थित होत्या.
सकाळी ६.४५ वाजता सुनक आणि त्यांचा ताफा दिल्लीतील जुने हिंदू मंदिर असलेल्या अक्षरधाम मंदिरात पोहोचला. यावेळी मंदिराचे आध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते त्यांनी पूजा केली. यावेळी ब्रिटीश पंतप्रधानांना स्वामीनारायण अक्षरधामचे विहंगावलोकन दाखवण्यात आले. अक्षरधाम मंदिर १०० एकर जागेवर पसरले असून हे मंदिर अध्यात्मिक आणि सांस्कृतिक संकुल असून भारताच्या परंपरा आणि प्राचीन वास्तूचा नमुना आहे.
मुख्य मंदिरात सुनक आणि त्यांच्या पत्नीने पवित्र प्रतिमांना आदरांजली वाहिली. तसंच, त्यांनी कला आणि वास्तुकलेची प्रशंसा केली. या जोडप्याने नीळकंठ वर्णी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक देखील केला आणि जागतिक शांतता, प्रगती आणि सौहार्द यासाठी प्रार्थना केली.
काय म्हणाले ऋषी सुनक?
यावेळी ऋषी सुनक म्हणाले की, “आम्ही या मंदिराच्या सौंदर्य, शांतता, सौहार्दाने आनंदित झालो आहोत. हे केवळ प्रार्थनास्थळच नाही, तर भारताची मूल्ये, संस्कृती आणि जगासमोरील योगदानाचेही चित्रण करणारी एक महत्त्वाची खूण आहे. ब्रिटनमध्ये ब्रिटिश भारतीय समुदायाने आपल्या देशासाठी केलेल्या सकारात्मक योगदानातून हीच मूल्ये आणि संस्कृती आपण आज ब्रिटनमध्ये पाहतो.”
ऋषी सुनक कसे पोहोचले मंदिरात?
“ऋषी सुनक यांनी आमच्याशी संपर्क साधून मंदिरात दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती . त्यांनी आम्हाला विचारले होते की ते कोणत्या वेळी भेट देऊ शकतात. आम्ही त्यांना जमेल तेव्हा ते येऊ शकतो असे सांगितले”, असं अक्षरधाम मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे म्हणाले. “त्यांनी मंदिरात आरती केली, येथील संतांची भेट घेतली, मंदिरातील सर्व मूर्तींना फुलेही वाहिली. त्यांच्या पत्नीनेही पूजा केली”, असंही दवे म्हणाले. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
या जोडप्याने मंदिरात सुमारे एक तास घालवला, अशी माहिती सूत्रांनी दिली. या भेटीबद्दल बोलताना अक्षरधाम मंदिराचे संचालक ज्योतिंद्र दवे म्हणाले की, सुनक मंदिरात अनवाणी आले. त्यांना भेटल्यानंतर आम्हाला ते सनातनच्या अगदी जवळ असल्यासारखे वाटले.”
हिंदू असल्याचा अभिमान
ऋषी सुनक यांनी रक्षाबंधनही साजरा केला आहे. तर, जन्माष्टमी त्यांना साजरी करता आली, अशी खंतही त्यांनी शुक्रवारी बोलून दाखवली होती. दरम्यान, “हिंदू असल्याचा मला अभिमान आहे. मी असाच मोठा झालो. मी असाच आहे. आशा आहे की, मी पुढील काही दिवस येथे असताना मंदिराला भेट देऊ शकेन”, असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते.
एक दिवसापूर्वी, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, अक्षरधामला सुनकच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर विस्तृत सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुनक दोन दिवसीय G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिर आणि परिसरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शनिवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, परिसरात पिकेट्स लावण्यात आल्या आहेत आणि सध्या सुरू असलेल्या G20 समिटमुळे तपासणी केली जात आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भेटीसाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील, असेही ते म्हणाले.