डेन्मार्क सरकारने सोमवारपासून जर्मनीबरोबर नॉर्डिक देशांच्या समुहातील नागरिकांवर करोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले देशातील प्रवेशबंदीचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळेच आता दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना परत एकमेकांना भेटता येणार आहे. असं असलं तरी यासाठी त्यांना पुरावा सादर करण्याची अजब अट डेन्मार्क पोलिसांनी ठेवली आहे. मागील सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्याचा पुरावा दिला तरच जोडप्यांना भेटता येईल असं डेन्मार्क पोलिसांनी सांगितल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्यांना आपल्या जोडीदाराला भेटायचं आहे त्यांना पोलिसांसमोर रिलेशनशिपचे पुरावे सादर करावे  लागणार आहेत. यामध्ये चॅट मेसेजेस, खासगी फोटो आणि खासगी माहिती यासारखे पुरावे जोडपी सादर करु शकतात असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस खात्याचे डेप्युटी चीफ असणाऱ्या डेप्युटी चीफ अ‍ॅलन डॅलाझर क्लॉउसेन यांनी डीआर या डॅनिश प्रसारमाध्याशी बोलताना, “ही जोडपी आपले फोटो किंवा प्रेमपत्र पुरावा म्हणून सादर करु शकतात. मला ठाऊक आहे की या खूप खासगी गोष्टी आहेत. मात्र जोडप्यांना परवानगी द्यावी की नाही हे ऐकून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या निर्णयावर अंतीम निर्णय अवलंबून असेल,” अशी माहिती दिली.

पोलीस खात्याच्या या निर्णयावर काही कायदेतज्ज्ञांनी आक्षेप नोंदवला आहे. अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीची खासगी माहिती मागणे हे त्या व्यक्तीच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखं आहे असं मत या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. “देशात प्रवेश देण्यासाठी लोकांकडून खासगी चॅट किंवा फोटो मागणारा देश याआधी मी कधीही पाहिला नाही. आपण जोडप्यांना परवानगी दिली आहे भेटायची मात्र त्यासाठी त्यांच्या खासगीपणाच्या अधिकारावर गदा आणली आहे,” असं ट्विट सोशल लिब्रल पार्टीचे क्रिस्टन हेगार्ड यांनी केलं आहे.

पुरावे सादर करण्याची अट ठेवण्यात आली असती तरी डेन्मार्क आणि आजूबाजूच्या नॉर्डिंग देशांमध्ये असलेल्या जोडप्यांसाठी निर्बंध शिथिल होणे ही मोठी दिलासादायक बातमी आहे. नॉर्डिक देशांमध्ये डेन्मार्क, स्वीडन, फिनलॅण्ड, नॉर्वे या देशांचा समावेश होतो. डेन्मार्कने निर्बंध शिथिल केल्याने मागील अनेक आठवड्यांपासून एकमेकांपासून दुरावलेल्या जोडप्यांना भेटता येणार आहे. डेन्मार्कने स्वत:च्या देशाने नागरिकत्व असलेल्या लोकांना वगळता इतर व्यक्तींना देशात येण्यास १४ मार्चपासून निर्बंध घातले होते. मात्र आता जवळजवळ दोन महिन्यानंतर हे निर्बंध उठवण्यात आले असून नॉार्डिक देशांमधील लोकांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नॉर्डिक देशांमधील सीमा हा अगदीच साध्या पद्धतीच्या असतात. अगदी कॉफी शॉप, रस्ते, पूल यासारख्या गोष्टींनी हे देश विभागले गेले आहेत. एका देशामधून दुसऱ्या देशात जाणे सहज सोप्पे आहे. मात्र यावरच करोनामुळे निर्बंध घालण्यात आले होते. जे आता शिथिल केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prove it with photos and love letters denmark will let cross border couples meet if they show proof scsg