कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या पाच कोटी सदस्यांना कोअर बँकिंगच्या धर्तीवर येत्या ऑक्टोबर महिन्यापासून कायमस्वरूपी खाते क्रमांक ( ‘पर्मनण्ट किंवा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर’) देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.
नोकरी बदलताना आपल्या भविष्य निर्वाह निधीचा खाते क्रमांक बदलण्याचा व्याप या नव्या खाते क्रमांकामुळे वाचू शकेल. अशा प्रकारचा खाते क्रमांक मिळाल्यानंतर एखाद्या सदस्याने नवीन नोकरी स्वीकारल्यावर त्याला नवा भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक मिळणार नाही. संघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या विशेषत: बांधकाम क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळेल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना हा कायमस्वरूपी खाते क्रमांक त्याच्या संपूर्ण सेवाकाळात उपयुक्त ठरेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘सी-डॅक’ची नियुक्ती करण्यात आली असून ही योजना येत्या १ ऑक्टोबरपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती आयुक्त के. के. जैन यांनी दिली.
कर्मचारी आपल्या नोकऱ्या बदलत असल्याने भविष्य निर्वाह निधीची रक्कम वळती करण्याचे सुमारे १२ लाख दावे संघटनेकडे येत असतात. या नवीन योजनेमुळे संस्थेवरील कामाचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होईल.