गरीबांना अन्न पुरविण्यासाठी करण्यात आलेला खर्च म्हणजे काही पैशांची उधळपट्टी नव्हे, असा दावा करून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. आगामी दिल्ली विधानसभेच्या पाश्र्वभूमीवर राहुल यांनी मंगळवारी केलेले हे भाषण म्हणजे निवडणूक प्रचारमोहिमेचा प्रारंभच असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अन्न सुरक्षा विधेयक हा युपीए सरकारचा अत्यंत योग्य निर्णय असून आता या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर देशभरात कोणीही भुकेले रहाणार नाही आणि गेल्या हजार वर्षांत प्रथमच असे घडत आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. गरीबांना अन्न सुरक्षा पुरविण्याचा मुद्दा संसदेच चर्चेसाठी आला तेव्हा विरोधकांनी त्याच्या विरोधात भूमिका घेऊन या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी पैशांची निव्वळ उधळपट्टी होईल, अशी टीका त्यांनी तेव्हा केली होती. परंतु ही जर उधळपट्टीच असेल तर ती आम्ही करीत राहणार, असेही राहुल यांनी सुनावले आणि एखाद्यास अन्न पुरविणे म्हणजे पैशांची उधळपट्टी ठरते काय, अशीही त्यांनी विचारणा केली.या विधेयकामुळे देशभरातील ८२ कोटी लोकांना फायदा मिळणार आहे.