गेल्या काही काळात महाराष्ट्रात विविध भरती घोटाळे समोर आले आहेत. आरोग्य विभागातील भरतीसह इतर विभागातील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. या घटना ताज्या असताना अलीकडेच कर्नाटकात देखील पीएसआय भरती घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्यात आता भारतीय जनता पार्टीचं कनेक्शन समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्या एका महिला नेत्याला अटक केली आहे.

संबंधित महिला नेत्या मागील काही दिवसांपासून पुण्यात लपून बसल्या होत्या. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून सीआयडीच्या पथकानं त्यांना पुण्यातून अटक केली आहे. दिव्या हागरगी असं अटक केलेल्या महिला नेत्याचं नाव आहे. त्या कर्नाटकातील कलबुर्गी येथील भाजपाच्या महिला युनिटच्या अध्यक्षा होत्या. पण हा घोटाळा उघडकीस येताच भारतीय जनता पार्टीने त्यांच्यापासून अंतर राखलं आहे. दिव्या यांचा भाजपाशी कोणताही संबंध नसल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

पण दिव्या हागरगी ह्या भाजपामध्ये सक्रिय होत्या. तसेच त्यांच्याकडे कलबुर्गी येथील भाजपाच्या महिला युनिटचं अध्यक्षपद होतं, याची पुष्टी स्थानिक लोक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी महिला दिव्या हागरगी यांची कलबुर्गी येथे ‘ज्ञान ज्योती संस्था’ नावाची शैक्षणिक संस्था आहे. त्यांच्या संस्थेत ऑक्टोबर २०२१ मध्ये पीएसआय परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षेत वीरेश नावाच्या एका उमेदवाराला १२१ गुण मिळाले होते. संबंधित परीक्षेत वीरेशचा सातवा क्रमांक आला होता. पण त्यानं केवळ २१ प्रश्न सोडवले असताना त्याला इतके गुण कसे मिळाले? याबाबत संशय आल्यानंतर चौकशी करण्यात आली. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

त्यानुसार पोलिसांनी दिव्या यांच्या पतीसह एकूण १७ जणांना यापूर्वीच अटक केली होती. पण दिव्या हागरगी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाल्या होत्या. अखेर शुक्रवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं त्यांना पुण्यातून अटक केली आहे. दिव्या यांच्या संस्थेत पीएसआय परीक्षा सुरू असताना सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आले होते. तसेच परीक्षार्थींना इतरही पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या नव्हत्या. दिव्या यांच्या संस्थेत वीरेशसह इतरही अनेक उमेदवारांनी गैरव्यवहार केला होता, अशी माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Story img Loader