एएनआय या वृत्तसंस्थेच्या एका पत्रकाराने पीटीआय या दुसऱ्या वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं हा आरोप केला असून या पत्रकाराने महिला पत्रकारावर अश्लील शेरेबाजी केल्याचाही दावा पीटीआयनं केला आहे. आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये पीटीआयनं आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यासह संबंधित घटनेचा व्हिडीओही शेअर केला आहे. एएनआयकडे त्यांनी कारवाईची मागणी करतानाच राष्ट्रीय महिला आयोगाकडे संबंधित पत्रकाराविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही पीटीआयनं जाहीर केलं आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना गुरुवारी सकाळी बंगळुरूमध्ये घडल्याचं पीटीआयच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “एएनआयच्या एका पत्रकाराकडून एक गंभीर कृती घडली असून पीटीआयच्या महिला पत्रकाराला मारहाण व अश्लील शेरेबाजी करण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या एका प्रेस कार्यक्रमात हा प्रकार घडला. यासंदर्भात एएनआय काही कारवाई करणार आहे का?” असा प्रश्न पीटीआयनं केलेल्या पोस्टमध्ये विचारण्यात आला आहे.
“या सगळ्या प्रकारामुळे पीटीआय व्यवस्थापन व संबंधित महिला पत्रकाराच्या सहकाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी पीटीआय कोणत्याही थराला जाऊ शकते”, असा इशारा पीटीआयच्या या पोस्टमध्ये देण्यात आला आहे.
घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू
दरम्यान, या सगळ्या प्रकारामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या प्रकारामुळे संबंधित महिला पत्रकाराला धक्का बसला आहे. आम्ही यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाकडेही दाद मागणार आहे, असं या पोस्टच्या माध्यमातून पीटीआयनं स्पष्ट केलं आहे.