‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते, पण सार्वजनिक वाचनालयांची अवस्था मात्र वाचनसंस्कृतीस अजिबात पोषक नाही. उत्तम पुस्तके असली तरी ती ठेवण्याची पद्धत सदोष, ग्रंथपालांची किंवा ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांची पुस्तके शोधण्याबद्दल असलेली अनास्था, अपुरा निधी, असे आजवर सार्वजनिक वाचनालयांचे चित्र होते. मात्र हे चित्र लवकरच बदलणार आहे. वाचनसंस्कृतीस उत्तेजन देण्यासाठी सरकारतर्फे ‘राष्ट्रीय वाचनालय मोहीम’ हाती घेण्यात आली आहे.
माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यात वाचनालयांची मोलाची भूमिका असते. त्यामुळे विविध कल्पक संकल्पना आणि क्लृप्त्या वापरून लोकांना प्रत्यक्षात तसेच डिजिटल स्वरूपातही वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव रवींद्र सिंग यांनी सांगितले.
नवा चेहरा..
प्रश्नमंजूषा स्पर्धा, संगीत स्पर्धा, सर्जनशील लेखन स्पर्धा यांच्या माध्यमातून वाचनालयांनी जनतेपर्यंत पोहोचावे, असे या मोहिमेत सूचित करण्यात आले आहे. सार्वजनिक वाचनालयांची केंद्रे स्थानिक स्तरावरील शाळांमध्येही उघडण्यात येणार आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावरील आभासी वाचनालयाची (व्हच्र्युअल लायब्ररी) स्थापना करण्याचा सरकारचा मनोदय आहे. देशभरात असलेल्या ६२९ वाचनालयांना या आभासी वाचनालयाशी जोडणे आणि ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ची सुविधा उपलब्ध करून देणे हे नव्या सरकारी योजनेचे वैशिष्टय़ आहे, अशी माहिती सांस्कृतिक खात्याचे सचिव रवींद्र सिंग यांनी दिली. तंत्रज्ञानाची जोड आणि पायाभूत सुविधांचा विकास ही या योजनेची मूलभूत वैशिष्टय़े असतील, अशी माहितीही सिंग यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा