राजधानी दिल्लीला गुरुवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडून काढले. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे दिल्लीच्या प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले आणि वाहतूक व्यवस्था कोलमडून अनेकांची तारांबळ उडाली.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीचे आकाश ढगाळ होते. पण दुपारी लख्ख सूर्यप्रकाश पडला होता आणि तापमानही वाढत चालले होते. तशात दुपारनंतर ढग भरून आले आणि सव्वापाचच्या सुमाराला झालेल्या पावसाने पारा पुन्हा घसरला. कार्यालयातून बाहेर पडू पाहणाऱ्या चाकरमान्यांना पावसाने गाठले. त्यामुळे अनेकांना परत कार्यालयाकडे फिरावे लागले. विशेष म्हणजे हवामान खात्याने वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची भविष्यवाणी वर्तविली होती. उद्याही दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून आजच्याप्रमाणेच कमाल तापमान ३३ अंश तर किमान १६ अंश सेल्सियस राहण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.