भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्याबाबत सरकार गंभीर नाही, असा देशातील नागरिकांचा ग्रह झाल्याचे मत केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी बुधवारी व्यक्त केले. प्रत्यक्षात केंद्र सरकार भ्रष्टाचार हटविण्यासाठी पावले उचलत असून, माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी हे याचे मोठे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माहिती अधिकार कायद्यामुळे गोपनीयतेच्या नावाखाली दाबून ठेवली जाऊ शकणारी माहिती उघड होऊ लागली आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसू लागलाय, असेही ऍंटनी यांनी स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ऍंटनी म्हणाले, माहिती अधिकार कायद्याचा अजून परिणामकारक वापर केला जात नाही. मात्र, येत्या काही वर्षांमध्ये देशातील नागरिकांमध्ये या कायद्याच्या वापराबद्दल अधिक जागृती होईल आणि त्यानंतर सरकारी कामकाजातील अनावश्यक गोपनीयता पूर्णपणे संपुष्टात येईल. या कायद्यामुळेच कोणतीही सरकारी संस्था गोपनीयतेच्या नावाखाली आपला गैरकारभार दडवून ठेवू शकणार नाही. त्यामुळेच भ्रष्टाचार संपुष्टात येईल.
गेल्या काही महिन्यांमध्ये उघडकीस आलेल्या वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकारविरोधात विरोधकांनी हल्लाबोल केला. टू जी घोटाळा, कोळसा खाण वाटप घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, हेलिकॉप्टर खरेदीतील लाचखोरी, रेल्वे खात्यातील लाचखोरी इत्यादी प्रकरणांमुळे सरकार अडचणीत आले असतानाच ऍंटनी यांनी भ्रष्टाचाराचे उच्चाटन होईल, असे मत मांडले आहे.