लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना संपत्ती घोषित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दहा वर्षांपूर्वी दिला. लोकप्रतिनिधी लोकसेवक असल्याने लोकांना आपले मत बनवताना त्यांच्याबाबत माहिती हवी हा उद्देश होता. मात्र दहा वर्षांनंतर सहा राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी निवडणूक लढवताना स्थावर मालमत्तेबाबत जाहीर केलेली माहिती पाहता त्याचे खरे मूल्य मात्र गुलदस्त्यात ठेवल्याचे चित्र आहे.
उमेदवाराने निवडणुकीनंतर अमाप संपत्ती जमवू नये हा हेतू या आदेशामागे आहे. इंडियन एक्स्प्रेसने राष्ट्रीय पक्षांचे प्रमुख नेते, पाच राज्यांचे मुख्यमंत्री यांची माहिती घेतली असता त्यांनी जनतेपुढे संपत्तीबाबत नेमका तपशील उघड केला नसल्याचे चित्र आहे. त्यामधील काही उदाहरणे पाहिली तर हे चित्र पुढे येते.
मीरा कुमार : लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी २००९ मध्ये दिल्लीतील ५२२ चौरस यार्डच्या त्यांच्या मालकीच्या घराची किंमत २.४ कोटी इतकी जाहीर केली. याखेरीज १११९ चौरस यार्ड घराचे मूल्य ४.९४ कोटी इतके दाखवले आहे. मात्र बाजारमूल्य पाहता त्यांची किंमत अनुक्रमे १२ आणि २६ कोटी इतकी आहे.
पी. जे. कुरियन : राज्यसभा निवडणुकीपूर्वी वरिष्ठ सभागृहाचे उपाध्यक्ष असलेल्या कुरियन यांनी तमिळनाडूतील थेंगसाई येथील ७ एकर आणि २७ गुंठे जमिनीची किंमत त्यांनी १.०९ लाख दाखवली आहे. मात्र गेल्या वर्षी त्या भागात पाच लाख एकर दर होता.
अशोक गेहलोत : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मालकीचा दिल्लीच्या द्वारका परिसरात १२५० चौरस फुटांचे घर आहे. त्याची किंमत ४५ लाख रुपये असल्याचे सांगितले. मात्र त्या परिसरात हा भाव सव्वा कोटीपर्यंत आहे. गेहलोत जर विकायला तयार असतील आपण त्यांना दुप्पट किंमत देऊ असे गमतीने काही घरांची खरेदी-विक्री करणाऱ्यांनी सांगितले.
सुशीलकुमार शिंदे : गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील मुनिरका विहार येथील आपल्या १२०० चौरस फूट बंगल्याचे मूल्य एक कोटी जाहीर केले होते. तर मुंबईतील बांद्रा येथील पाली हिल परिसरातील १३१.०४ चौरस मीटर बंगल्याचे मूल्य १.२९ कोटी जाहीर केले. मात्र या क्षेत्रातील जाणकारांच्या मते २००९ मध्ये या मालमत्तांची किंमत अनुक्रमे २ कोटी आणि अडीच कोटी इतकी असावी.
तारिक अन्वर : राज्यसभेतील राष्ट्रवादीचे नेते असलेल्या तारिक अन्वर यांनी दिल्लीच्या द्वारका परिसरातील १९०० चौरस फुटांच्या फ्लॅटचे मूल्य २००९ मध्ये २५ लाख दाखवले आहे. मात्र त्यावेळचा जागेचा दर पाहता याचे मूल्य एक कोटीच्या आसपास हवे.
सोनिया गांधींचे नाव वगळले
वॉशिंग्टन: अमेरिकेतील एका वृत्त संकेतस्थळाने जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांच्या यादीतून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव वगळले आहे. संकेतस्थळावरील माहिती निखालस खोटी असल्याचे मत काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आल्यानंतर गांधी यांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे. सोनिया गांधी यांच्यासह कतारचे माजी अमीर हमीद बिन खलिफा अल-थानी यांची नावे जगभरातील श्रीमंतांच्या यादीची पुनर्रचना करताना वगळली असल्याचे हफिंगटन पोस्टच्या संपादकांनी संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००४ आणि २००९ मध्ये प्रतिज्ञापत्रात डेरा मंडी येथील ३ बिघा जमिनीची किंमत जाहीर केली. याखेरीज याच परिसरातील सुलतानपूर खेडय़ातील १२ बिघा आणि १५ बिस्व जमिनीची किंमत २.१९ लाख इतकी दाखवली आहे. परताव्यानुसार किंमत असल्याचे सोनियांनी सांगितले. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बाजारमूल्यापेक्षा ही किंमत खूपच कमी आहे. याच परिसरात बसप उमेदवार कन्वर सिंग तन्वर यांनी २००८ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी डेरा येथील १२ बिघा आणि ५ बिस्व जमिनीची किंमत १८.३७ कोटी इतकी जाहीर केली होती.
२००९ मध्ये भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी लखनौच्या गोमतीनगर परिसरातील विपुल खंड येथे स्वत:च्या मालकीचे घर असल्याचे जाहीर केले. त्याची किंमत ५५ लाख रुपये असल्याचे सांगितले, मात्र घराचा आकार जाहीर केलेला नाही.
बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी २०१२ मध्ये दिल्लीच्या कॅनट प्लेस परिसरात ३६२८ चौरस फूट आणि ४५३५ चौरस फूट अशी दोन दुकाने असल्याचे जाहीर केले. त्याचे मूल्य त्यांनी ९.३९ कोटी आणि ९.४५ कोटी असल्याचे जाहीर केले. मात्र या क्षेत्रातील जाणकारांच्या मते त्याची किंमत अनुक्रमे १२ आणि १५ कोटीपर्यंत आहे. याखेरीज चाणक्यपुरी परिसरात ४२ हजार ९०७.८७ चौरस फूट घराची किंमत ६१.८६ कोटी दाखवली आहे. या परिसरात चौरस फुटाचा भाव १.९२ लाख ते ३.८८ लाख इतका आहे. मायावतींच्या घराचे मूल्य १ लाख चौरस फुटाने गृहीत धरले तरी त्याचे मूल्य ४२९ कोटी होईल.