ह्रषीकेशमधील पुलकित आर्या यांच्या ‘वनतारा’ रिसॉर्टजवळील कालव्यात बेपत्ता अंकिता भंडारी या तरुणीचा मृतदेह आढळ्यानंतर या रिसॉर्टला स्थानिकांनी पेटवून दिले आहे. या रिसॉर्टमध्ये पीडित तरुणी रिसेप्शनीस्ट म्हणून काम करत होती. या तरुणीच्या खूनप्रकरणी उत्तराखंडमधील भाजपा नेते विनोद आर्या यांचे पुत्र पुलकित हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी पुलकित यांच्यासह दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर पुलकित यांचे भाऊ आर्यन यांना उत्तराखंडच्या ओबीसी आयोगाच्या उपाध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे.
VIDEO: पुलकित आर्याच्या मालकीच्या रिसॉर्टचे पाडकाम, तरुणीच्या हत्या प्रकरणात अटकेनंतर सरकारची कारवाई
या खून प्रकरणाच्या तपासासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. “या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक पी. रेणुका देवी यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे”, अशी माहिती ट्वीट करत धामी यांनी दिली आहे. या प्रकरणावर धामी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री धामी यांच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री ‘वनतारा’ रिसॉर्टचे पाडकाम करण्यात आले आहे. या कारवाईनंतर स्थानिकांनी हे रिसॉर्ट पेटवून दिले आहे. “पीडित तरुणी आणि आरोपी रविवारी ह्रषीकेशला गेले होते. या ठिकाणाहून परतत असताना पुलकित आणि पीडितेचा वाद झाला. त्यानंतर आरोपींनी पीडितेला चिल्ला येथील कालव्यामध्ये ढकलून दिले” अशी माहिती पौरी गर्हवालचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यशवंत सिंह यांनी दिली आहे.