पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नी राजस्थान सरकारविरोधात आंदोलन करत आहे. सरकारने दिलेल्या आश्वसनांची पूर्तता न केल्याचा आरोप जवानांच्या पत्नींनी केला आहे. त्याविरोधात जयपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत आहे. अशातच या आंदोलनाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी जवानांच्या पत्नींना मारहाण केली आहे.
२०१९ साली पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसला जोरदार धडक दिली होती. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर राजस्थान सरकारने शहीदांच्या पत्नींना मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण, अद्यापही आश्वासनांची पूर्तता सरकारने केली नाही. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल कलराज मिश्रांकडे जवानांच्या पत्नींनी इच्छा मरणाची परवानगी मागितली. तसेच, सरकारविरोधात दोन दिवसांपासून जयपूरमध्ये आंदोलन सुरु केलं आहे.
त्यातच आंदोलनकर्त्यां जवानांच्या पत्नी मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांना भेटण्यासाठी जात होत्या. तेव्हा पोलिसांनी जवानांच्या पत्नींना मारहाण केली आहे. या मारहाणीत एक महिला जखमी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ देशात व्हायरल होत असून, सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. तर, ‘शहीद जवानांच्या पत्नींचा सरकारने अपमान केला,’ असा आरोप भाजपा राज्यसभा खासदार किरोडी लाल मीणा यांनी केला आहे.