पुलवामा येथील मशिदीत नमाज पठण करणाऱ्यांना जय श्रीरामचे नारे द्यायला लावले आणि भारतमाता की जय म्हणायला लावलं असा आरोप आता मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. एवढंच नाही तर या प्रकरणी चौकशी केली जावी अशीही मागणी करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फ्रंसचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या विषयीचं ट्वीट केलं आहे. पुलवामा येथील घटना ही त्रस्त करणारी आहे या आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. तसंच मला आशा आहे की संरक्षण मंत्री राजनाथ शिंह या प्रकरणी लक्ष घालतील.
पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही कथित घटनेचा निषेध नोंदवला आहे. जे काही घडलं आहे ते ऐकून मी सुन्न झाले आहे. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मुफ्ती यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी एका अधिकाऱ्याला कामावरुन कमी करण्यात आलं आहे तसंच आम्ही या घटनेची चौकशी सुरु केली आहे असं लष्कराने म्हटलं आहे. शनिवारी पुलवामा येथील झदुरा या ठिकाणी ही कथित घटना घडल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी काश्मीर दौऱ्यावर होते. पुढील महिन्यात अमरनाथ यात्रा सुरु होणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. त्यावेळी पुलवामा येथील मशिदीत कथित रुपाने जय श्रीरामचे नारे नमाज पठण करणाऱ्यांना म्हणायला लावले गेले असा आरो आहे. या प्रकरणाला मेहबुबा मुफ्ती यांनी वाचा फोडली होती. त्या आरोप करत म्हणाल्या की ५० लष्करी जवान मशिदीत घुसले त्यांनी जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडलं ही बातमी ऐकून मी सुन्न झाले आहे. अमित शाह हे दौऱ्यावर असताना असा प्रकार होणं हे दुर्दैवी आहे असंही त्या म्हणाल्या.
डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनीही यावर भाष्य केलं आहे. “पुलवामा येथील मशिदीत कथित रुपाने जी घटना घडल्याचं समोर येतं आहे ती बाब निंदनीय आहे. या आरोपांच्या मुळाशी जायला हवं. अशा गोष्टी होणं हे आपल्या देशाच्या संस्कृतीला शोभणारं नाही.” या आशयाचं ट्वीट आझाद यांनी केलं आहे.