माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अजीज कुरेशी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आखलेला पूर्वनियोजित कट होता असा धक्कादायक आरोप केला आहे. अजीज कुरेशी यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अजीज कुरेशी उत्तराखंड आणि मिझोरामच्या राज्यपालपदी होते.

अजीज कुरेशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत विचारणा केली आहे की, ‘स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश मिळाला कसा ?’. पुढे ते म्हणाले की, ‘जर नरेंद्र मोदींना वाटत असेल की ४० सीआरपीएफ शहीद जवानांचा फायदा घेत ते निवडणूक जिंकतील तर त्यांना मतदार चोख उत्तर देतील’.

याआधी काँग्रेस नेते बी के हरिप्रसाद यांनीही असंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पुलवामा दहशतवादी हल्ला नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यातील मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसंच समजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनीही पुलवामा हल्ला कट असल्याचा आणि मतांसाठी सीआरपीएफ जवानांचा बळी दिल्याचा आरोप केला होता.

अजीज कुरेशी यांनी यावेळी मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात अद्याप उमेदवार जाहीर न केल्याने भाजपाला टोला लगावला. भाजपाला दिग्विजय सिंह यांच्याविरोधात पराभव होण्याची भीती वाटत असून याचा कारणामुळे उमेदवारी जाहीर करण्यात उशीर करत असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी काँग्रेस मध्य प्रदेशात २७ पैकी २० जागांवर विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. भाजपा आमदार आणि खासदारांनी राज्यातील अनेक कारखाने बंद केल्याचा आरोप करत अजीज कुरेशी यांनी भाजपा नेत्यांना मध्य प्रदेशातील लोकांकडे मत मागण्याचा कोणताच अधिकार नसल्याचं म्हटलं आहे.