वेळ सकाळी पावणे दहाची. दुपारचे ऊन वाढण्याआधी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात. तेवढ्यात एक तरुणी शाळेच्या आवारात निळ्या रंगाची नवारी आणि डोक्याला मुंडावळया घालून प्रवेश करते. तिच्याकडे पाहूनच ती नववधू असल्याचे लगेच लक्षात येते. या तरुणीची लगबग आणि घाई पाहता रांगेतील सर्वच जण तिला आधी मतदान करता यावे म्हणून केंद्रात जाण्याासाठी जागा करून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपण रांगेत उभं राहूनच मतदान करणार असल्याचं ती सांगते. काही मिनिटे आपल्या कुटुंबाबरोबर रांगेत उभं राहिल्यानंतर मतदान करते. मेहंदी रंगलेल्या हाताला शाई लावून घेते आणि ती मतदान केंद्राबाहेर पडते. आपल्या लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावणारी ही तरुणी आहे पुण्याची श्रद्धा गजानन भगत.
लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. निवडणुकीत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये प्रबोधन केले जाते. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असतानाच पुण्यातील श्रद्धा गजानन भगत या तरुणीने स्वत:च्या लग्न मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. नववधू म्हणून नटलेल्या श्रद्धाने अप्पा बळवंत चौकातील नु.म.वि शाळेतील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला.
तुळशीबाग परिसरात राहणाऱ्या श्रद्धाचा आज अमित सातपुते या तरुणासोबत विवाह होणार आहे. मात्र लग्न पंडपात जाण्याआधी तिने मतदान करण्याचा निर्णय घेतला आणि वऱ्हाड थेट मतदार केंद्रात पोहचले. याविषयी श्रद्धाशी संवाद साधला असता, ‘आज मी एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. पण त्याच दिवशी मतदान आहे. याचा मला खूप आनंद होत असून नव्या आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदानाचा हक्क बजावून पुढील प्रवासाला सुरुवात करण्याचे ठरविले आणि लग्नाला जाण्याआधी इथे मतदान करायला आले’, असं सांगितले. तसेच आज मी ज्याप्रकारे मतदानाचा हक्क बजावीत आहे. त्याप्रमाणे समाजातील प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन देखील श्रद्धाने केले.