विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याने आता देशात जगण्यासाठी सर्वांत चांगल्या शहरांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत पुणे जगण्यासाठी सर्वाधिक चांगले शहर असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्ली थेट ६५ व्या क्रमांकावर घसरली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने ही यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे जगण्यासाठी योग्य अव्वल १० शहरांमध्ये महाराष्ट्राच्या तीन शहरांचा समावेश आहे. या यादीत नवी मुंबई, मुंबई या शहरांनीही क्रमश: दुसरे आणि तिसरे मिळवले आहे. तर ठाणे शहर सहाव्या स्थानी आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतील एकाही शहराला अव्वल १० मध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे सर्वेक्षण देशातील १११ शहरांमध्ये करण्यात आले. शहरांची निवड करताना संस्था, प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आल्याचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सुरी यांनी सांगितले. या यादीत चेन्नईला १४ वा क्रमांक मिळाला आहे. कोलकाताने सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिला होता.

मंत्रालयाने १११ मोठ्या शहरांमध्ये सर्वेक्षण करून जारी केलेल्या या यादीत राजधानी दिल्लीचा खालचा क्रमांक लागला आहे. यावर्षी दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली होती. टॉप १० शहरांमध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या राजधींनींना स्थान मिळाले आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूर शहराला या यादीत तळाचा क्रमांक मिळाला आहे. टॉप १० शहरांच्या यादीत चौथ्या स्थानी तिरूपती, पाचव्या क्रमांकावर चंदीगड, सातव्या स्थानी रायपूर, इंदूर आठव्या, विजयवाडा नवव्या तर भोपाळ दहाव्या स्थानी आहे.

सुरूवातीला या सर्वेक्षणात ११६ शहरांचा समावेश करण्याची योजना होती. यामध्ये सर्व १०० स्मार्ट शहर आणि ज्या शहरांची लोकसंख्या १० लाखांहून अधिक होती अशांचा समावेश करण्यात आला होता. हावडा, न्यू टाऊन कोलकाता आणि दुर्गापूरने या सर्व्हेत भाग घेण्यास नकार दिला होता. नवीन रायपूर आणि अमरावती (आंध्र प्रदेश) हे सर्वेक्षणाच्या निकषात बसू शकले नाहीत, असेही सुरी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune most livable city new delhi ranks 65 in govts ease of living index