Pune Porsche Crash Latest Updates: १९ मे रोजी पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श ही कार मद्यधुंद अवस्थेत चालवत दोघांना चिरडलं. या घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. तसंच राजकीय आरोपही केले जात आहेत. अशात या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेशातून अश्विनी कोस्टाच्या आईची मन सून्न करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अजित पवार?

“पुणे पोर्श अपघात प्रकरणा राज्य सरकार आणि पोलीस योग्य कारवाई करत आहेत. आम्ही सारखे कॅमेरासमोर येत नाही याचा अर्थ आम्ही लपवाछपवी करत आहोत, कुणाला तरी पाठिशी घालत आहोत असा होत नाही. विरोधकांनी काय आरोप करायचे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र ही घटना घडल्यापासून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुलाच्या बापाला, बापाच्या बापालाही अटक केली

“पोर्श अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले, त्यांच्यावरही कारवाई झाली अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाच्या रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येते आहे. अपघात घडला तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या कक्षेत येते. त्यांनीही संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपल्या खात्याल सूचना दिल्या आहेत. एकूणच हे प्रकरण सगळ्यांनी गांभीर्याने घेतले आहे. रोज तपास पुढे सरकत आहे, दोषींवर कारवाई केली जात आहे. आधी मुलाला अटक झाली नव्हती, त्याला नंतर अटक करण्यात आली. त्यानंतर मुलाच्या बापाला, बापाच्या बापालही अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही”, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

हे पण वाचा- पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही घेण्यात आलं ताब्यात, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

१९ मेच्या पहाटे काय झालं?

पुण्यात १९ मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बाईकवरुन घरी जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवलं. या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र १५ तासांत त्याला जामीन मिळाला. १५ तासांत त्याला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजात संताप व्यक्त झाला. १९ तारखेपासून या घटनेवर विविध पडसाद उमटत आहेत. समाजात हा विषय चर्चिला जातो आहे. अशात या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आता या प्रकरणी मन सून्न करणारी प्रतिक्रिया अश्विनीच्या आईने दिली आहे.

काय म्हटलं आहे अश्विनीच्या आईने?

“आम्ही मध्य प्रदेशात राहतो, पण सरकारतर्फे आमचं कुणी सांत्वनही केलं नाही. आम्हाला पाठिंबा द्यायलाही कुणी आलं नाही. मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती केली पाहिजे की या प्रकरणी लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा. माझी मुलगी तर आता या जगात नाही. पण इतर एकाही आईला असा अनुभव यायला नको आणि धनिकांच्या बाळांनी असं कुणाला चिरडायला नको त्यामुळे आमची ही अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. ” पीटीआयला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आता या प्रकरणी काय होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या प्रकरणात आम्ही कुणालाही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनीही दिली आहे. तसंच तपास योग्य पद्धतीने सुरु आहे असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनीही म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche car crash case it has been 12 days but nothing has happened said mother of ashwini koshta scj