Indian cities with slowest traffic in 2024-25 : देशभरात सर्वच मोठ्या शहरांमधील गर्दी प्रमाणाच्या बाहेर वाढली आहे. वाढते शहरीकरण याबरोबरच वाहतूक कोंडी हा प्रश्न देखील झपाट्याने वाढला आहे. मोठ्या शहरांमध्ये अवघ्या काही किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी कित्येक तासांच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
फक्त भारतातच नाही तर जगभरातील मोठ्या शहरांमध्ये राहणार्या नागरिकांना या समस्येचा सामना करवा लागत आहे. वाढलेला प्रवासाचा कालावधी यामुळे देशाची एकंदरीत उत्पादकता कमी होणे आणि नागरिकांचा मानसिक ताण वाढणे यासारख्या समस्या उद्भवत आहेत. टॉम्स ट्राफिक इंडेक्स २०२४ (Tom’s Traffic Index 2024) नुसार, जगातील ७६ टक्के शहरांमध्ये गेल्या वर्षभरात वाहतुकीच्या सरासरी वेगात घट झाल्याचे आढळून आले आहे. रस्त्यांची रचना ज्यामध्ये महामार्ग, मुख्य रस्ते, अरूंद रस्ते, एकाच बाजूने जाणाऱ्या मार्गिका आणि दोन किंवा अधिक रस्ते एकत्र येऊन झालेली गुंतागूंत यांचा वाटा मोठा आहे. अशा रस्त्यांवर काही अनपेक्षित घटना घडल्या तर वाहतुकीत अडथळा होता आणि वाहतुकीची गती मंदावते.
जगभरातील परिस्थिती कशी आहे?
कोलंबियामधील बॅरँक्विला (Barranquilla) येथे गेल्या वर्षी जागतिक स्तरावर सर्वात कमी वाहतुकीचा सरासरी वेग नोंदवला गेला. येथे वाहतुकीचा सरासरी वेग हा फक्त १०.३ मैल प्रतितास इतका होता, म्हणजे अवघ्या सहा मैलांचा प्रवास करण्यासाठी जवळपास ३५ मिनिटे प्रवासात घालवावी लागली.
लंडन या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर होते, पण याचा क्रमांक थोडा खाली घसरला असून जागतिक आणि युरोपीयन रँकिंगमध्ये लंडन पाचव्या स्थानावर गेले आहे. येथे सरासरी वेग हा ११.२ मैल प्रतितास इतका राहिला. जगभरातील शहरे जसे की डब्लिन, मिलान आणि टोरंटो या शहरांमध्ये देखील अशीच स्थिती आहे.
भारतातही गंभीर परिस्थिती
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शहरांमध्ये देखील वाहतुकीच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. नागरिकांना कित्येक तास दररोज वाहतूक कोंडीत घालवावे लागत आहेत. विशेष म्हणजे, भारतातील तीन शहरांनी टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२४ मध्ये जागतिक स्तरावर पहिल्या पाच सर्वात मंद वाहतूक असलेल्या शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.
भारताचे आयटी कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे शहर बंगळुरू हे वाहनांनी खच्च भरलेले शहर म्हणून कुप्रसिद्ध आहे. बंगळुरूमध्ये २०२३ च्या तुलनेत १० किलोमीटर अंतर प्रवास करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ ५० सेकंदांनी वाढला आहे. सध्या शहरात १० किमी प्रवासासाठी ३४ मिनिटं आणि १० सेकंद इतका वेळ लागतो. तर कोलकाताने बंगळुरूलाही मागे टाकले आहे. कोलकाता येथे सरासरी १० किमी अंतर पार करण्यासाठी ३४ मिनिटं आणि ३३ सेकंद इतका वेळ लागतो.
हेही वाचा>> VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
या खालोखाल जागतिक स्तरावर पुण्याचा चौथा नंबर लागतो, येथे १० किमी अंतरासाठी ३३ मिनिटं आणि २७ सेकंद इतका वेळ लागतो. यामुळे भारतातील मोठ्या शहरात वाहतुकीची समस्या किती गंभीर बनली आहे हेच अधोरेखित होते.
भरतातील कोणत्या शहरामध्ये सर्वात मंद वाहतूक आहे?
रँक | जागतिक रँक | शहर | राज्य | सरासरी प्रवास वेळ प्रति १० किमी | गर्दीच्या वेळी दर वर्षी गमावलेला वेळ |
१ | २ | कोलकाता | पश्चिम बंगाल | ३४ मिनिटे ३३ सेकंद | ११० तास |
२ | ३ | बंगळुरू | कर्नाटक | ३४ मिनिटे १० सेकंद | ११७ तास |
३ | ४ | पुणे | महाराष्ट्र | ३३ मिनिटे २२ सेकंद | १०८ तास |
४ | १८ | हैदराबाद | तेलंगाणा | ३१ मिनिटे ३० सेकंद | ८५ तास |
५ | ३१ | चेन्नई | तामिळनाडू | ३० मिनिटे २० सेकंद | ९४ तास |
६ | ३९ | मुंबई | महाराष्ट्र | २९ मिनिटे २६ सेकंद | १०३ तास |
७ | ४३ | अहमदाबाद | गुजरात | २९ मिनिटे ३ सेकंद | ७३ तास |
८ | ५० | एर्नाकुलम | केरळ | २८ मिनिटे ३० सेकंद | ८८ तास |
९ | ५२ | जयपूर | राजस्थान | २८ मिनिटे २८ सेकंद | ८३ तास |
१० | १२२ | नवी दिल्ली | दिल्ली | २३ मिनिटे २४ सेकंद | ७६ तास |
टीप: टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने या शहरांमध्ये दर १०-किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी लागणारा सरासरी वेळ या आधारवर ही रँकिंग तयार केली आहे. ज्याच्या माध्यमातून या शहरात वाहनांच्या गर्दीचा अंदाज येतो.