प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी शब्द शोधता येत नसला, तरी गरज नसेल तिथे उगाचच इंग्रजीचा वापर करू नये, असा सूर शनिवारी घुमान येथे सूरू असलेल्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अभिरूप न्यायालयात व्यक्त करण्यात आला.
दृक-श्राव्य माध्यमांतील संहितालेखन या विषयावर अभिरूप न्यायालय आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेते मोहन जोशी, संहिता लेखक आणि अभिनेते संजय मोने, एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, लेखक राजन खान आणि रसिका देशमुख यांनी सहभाग घेतला.
पुण्यात जे बोलले जाते ती प्रमाण भाषा हा गैरसमज असल्याचे मत राजन खान यांनी व्यक्त केले. राज्याच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा बोलली जाते. त्यामुळे कोणतीही एक प्रमाण भाषा असे ठरवता येणार नाही. असे ठरविण्याचा प्रयत्न केल्यास वेगवेगळ्या भागात बोलल्या जाणाऱया बोली भाषांवर अन्याय केल्यासारखे होईल, असे मत त्यांनी मांडले. सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर इंग्रजी भाषेचा मोठा वापर केला जातो. त्यावर त्यांनी टीका केली. त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांनीही त्यांच्याकडे मुद्रितशोधक नेमले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सध्याच्या काळात शहरी भागामध्ये मराठीतून बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मराठीतून बोलताना इंग्रजी शब्द वापरले नाहीत. तर तुम्ही सुमार दर्जाचे आहात, असा काही लोकांचा समज झाला आहे. यासाठी शासनाने कठोर धोरण तयार केले पाहिजे, अशी अपेक्षा संजय मोने यांनी व्यक्त केली. दूरचित्रवाहिन्यांसाठी संहिता लेखन करताना काही तडजोडी कराव्या लागतात. त्याला सर्वस्वी लेखकच जबाबदार असतो, असेही त्यांनी सांगितले.
मराठी भाषा वापरण्याचा आग्रह योग्य असला, तरी अट्टाहासाने प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे मत राजीव खांडेकर यांनी मांडले. ते म्हणाले, लिखित स्वरुपातील मराठीसाठी प्रमाण भाषा ठरवता येऊ शकेल. मात्र, बोली भाषेसाठी कोणतीही एक प्रमाण भाषा ठरवता येणार नाही. मराठी भाषेचे सौंदर्य वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जाणाऱया बोली भाषांमध्ये आहे. छोट्या छोट्या मराठी बोली भाषांचे प्रवाह जगले, तरच मराठी जगेल.
रामदास फुटाणे यांनी अभिरूप न्यायालयाचा शेवट करताना सांगितले की, घरामध्ये प्रत्येकाने जाणीवपूर्वक मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर बाहेरील जगासाठी इंग्रजीही शिकली पाहिजे. मराठीचा अधिकाधिक वापर केला जावा, यासाठी प्रत्येकानेच आग्रही राहिले पाहिजे.
सुधीर गाडगीळ यांनी या अभिरूप न्यायालयाचे सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा