Punjab AAP Politics : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाला समोरं जावं लागलं. त्यानंतर या पराभवाचा परिणाम पंजाबमध्ये देखील दिसून येऊ लागला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे दिल्लीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दुसरीकडे ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल हे पंजाब सरकारमध्ये हस्तक्षेप करत असल्याचाही आरोप होत आहे. यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. असं असतानाच आता पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा एक अजब प्रकार समोर आला आहे.
आम आदमी पक्षाचे नेते तथा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वात पंजाबमध्ये ‘आप’चं सरकार सत्तेत आहे. मात्र, भगवंत मान यांच्या सरकारमधील एका मंत्र्याकडे जे खातं देण्यात आलं होतं, ते खातं अस्तित्वातच नव्हतं अशी माहिती आता समोर आली आहे. मात्र, तरीही २० महिने त्या खात्याचे मंत्री म्हणून मंत्री कुलदीप सिंग धालीवाल हे काम पाहत होते. या प्रकारावरून पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी भगवंत मान यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, पंजाब सरकारमधील मंत्री कुलदीप सिंग धालीवाल २० महिन्यांपासून जे खातं देण्यात आलं होतं. पण ते खातं अस्तित्वातच नाही हे समजायला पंजाब सरकारला २० महिने लागल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. त्यामुळे एवढे दिवस मुख्यमंत्री भगवंत मान नेमकं काय करत होते? असे सवाल उपस्थित करत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भगवंत मान यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत.
विरोधकांनी टीका केल्यानंतर आता पंजाब सरकारने मंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांच्याकडे असलेल्या खात्याच्या संबंधित अधिसूचना जारी करून भूमिका स्पष्ट केली आहे. आता पंजाब सरकारने राज्यमंत्री कुलदीप सिंग धालीवाल यांच्या नेतृत्वाखालील तथाकथित प्रशासकीय सुधारणा विभाग रद्द केला आहे. मात्र, हा प्रशासकीय सुधारणा विभाग २० महिन्यांपासून अस्तित्वातच नव्हता. पंजाबच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी या संदर्भात एक राजपत्र जारी केलं. त्यामध्ये अधिसूचनेनुसार विभाग रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री मान यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असल्याचं म्हटलं आहे.
You can imagine the crisis in Punjab government if it took nearly 20 months to realise that a department assigned to one of its prominent ministers never actually existed.
— Amit Malviya (@amitmalviya) February 22, 2025
Arvind Kejriwal is a charlatan who must be banished from public life. https://t.co/DbP0XlWbNx
अमित मालवीय काय म्हणाले?
भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी पंजाब सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. मालवीय यांनी म्हटलं की, “पंजाब सरकारच्या एका प्रमुख मंत्र्याला सोपवलेले विभाग प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हते हे कळायला जवळपास २० महिने लागले तर पंजाब सरकारमधील संकटाची तुम्ही कल्पना करू शकता. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना एक ढोंगी माणूस आहेत ज्यांना सार्वजनिक जीवनातून हद्दपार केले पाहिजे अशी टीका केली आहे”, असं अमित मालवीय यांनी म्हटलं आहे.