नवी दिल्ली : पंजाब विधानसभेची निवडणूक अवघ्या पाच दिवसांवर आली असताना, माजी मंत्री व पंजाबमधून तीनवेळा राज्यसभेचे खासदार झालेले अश्वनीकुमार यांनी मंगळवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेस रसातळाला जात असल्याचे कारण देत त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला.
काँग्रेस पक्षापासून लांब राहून देशाची अधिक सेवा करू शकतो, असे अश्वनीकुमार यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद, आरपीएन सिंह आदी नेते काँग्रेसमधून बाहेर पडले व त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अश्वनीकुमार यांनी मात्र अजून पुढील राजकीय वाटचालीबद्दल जाहीर भाष्य केलेले नाही.
संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेत असताना मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये अश्वनीकुमार यांनी केंद्रीय विधिमंत्रीपद भूषवले होते. ते २००२, २००४ आणि २०१० असे तीनदा पंजाबमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. अश्वनीकुमार यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमिरदर सिंग यांना काँग्रेसने अपमानित केले. त्याचा प्रतिकुल परिणाम राज्यातील मतदारांवर पडला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे नव्हे तर ‘आप’चे सरकार सत्तेवर येऊ शकेल, असे मत अश्वनीकुमार यांनी व्यक्त केले. पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.