पंजाबमध्ये अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी बाकांवरील शिरोमणी अकाली दलाने तयारी सुरू केली आहे. पंजाबमध्ये २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होत असून, अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अकाली दल शेतकरी कायद्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि एनडीएतून बाहेर पडला असून, विधानसभा निवडणूक आता बसपा सोबत लढणार आहे. त्यामुळे गटबाजीचा सामना करणाऱ्या काँग्रेसला येत्या निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी आघाडी झाल्याची घोषणा केली.
पंजाबमध्ये सध्या काँग्रेस सत्तेत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत असून, पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग या दोन्ही नेत्यांच्या गटात सध्या तणाव आहे. काँग्रेस ही गटबाजी संपवण्याचा प्रयत्न करत असून, शिरोमणी अकाली दलाने शनिवारी २०२२मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात घोषणा करत काँग्रेस धक्का दिला आहे.
हेही वाचा- पंजाब प्रदेश काँग्रेसबाबतचा अहवाल सोनिया गांधी यांना सादर
तीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून भाजपा आणि एनडीएतून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकाली दलाने मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षांनी यावर शिक्कामोर्तब केलं असून, जागा वाटपाही निश्चित झालं आहे. ११७ जागांसाठी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बसपा २० जागा लढवणार आहे, तर अकाली दल ९७ जागा लढवणार आहे. दोन्ही पक्ष तब्बल २७ वर्षांनी एकत्र आले असून, १९९६मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढले होते.
Today is an epoch making day. @Akali_Dal_,a 100 yr old party which always worked for interests of farmers, traders & poorer sections, has formed an alliance with BSP, the party of Punjabi son of soil–Saheb Kanshi Ram Ji & his worthy successor Behan @Mayawati Ji.#SAD_BSP_Alliance pic.twitter.com/tvZk9tlMEY
— Sukhbir Singh Badal (@officeofssbadal) June 12, 2021
शिरोमणी अकाली दल आणि बसपा आघाडीची घोषणा करता बहुजन समाज पार्टीचे खासदार सतीश मिश्रा उपस्थित होते. “शिरोमणी अकाली दलासोबत आघाडी, हा ऐतिहासिक दिवस आहे. अकाली दल पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष असून, १९९६मध्ये शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीने एकत्र लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी १३ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. आता आघाडी तुटणार नाही,” असं मिश्रा म्हणाले.