एकीकडे गुजरातमध्ये विजय रुपानी यांच्यासोबत आख्खं मंत्रिमंडळच बरखास्त करून नवं कोरं मंत्रिमंडळ भाजपानं सत्तेवर बसवलं असताना दुसरीकडे काँग्रेसनं देखील काहीसा तोच कित्ता गिरवल्याचं पंजाबच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी समारंभात दिसून आलं. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमवीर नवे मुख्यमंत्री चरणजीस सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळात ६ नव्या मंत्र्यांचा समावेश केला आहे. एकूण १५ मंत्र्यांचं हे मंत्रिमंडळ असणार आहे. मंत्रिमंडळातून काही आधीच्या मंत्र्यांना डच्चू देखील देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय घडामोडी आणि पंजाबमधील राजकीय वर्तुळातील गणितं मंत्रिमंडळ विस्तारातून दिसून येत असल्याचं सांगितलं जात आहे.

पंजाबच्या मंत्रिमंडळात आज ब्रह्म मोहिंद्रा, मनप्रीत सिंग बादल, त्रिप्त राजिंदर सिंग बाजवा, सुखबिंदर सिंग सरकारिया, राणा गुरजीत सिंग अरुणा चौधरी, रझिया सुलताना, भारत भूषण अशू, विजय इंदर सिंगला, रणदीप सिंग नाभा, राद कुमार वेर्का, संकत सिंग गिलझियान, परगत सिंग, अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुरकिरत सिंग कोटिल या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ब्रह्म मोहिंद्रा हे पंजाब काँग्रेसमधील महत्त्वाचे ज्येष्ठ नेते आहे. ते काँग्रेससोबत माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याहूनही वजास्त काळ आहेत. आधीच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचं खातं होतं. रणदीप सिंग नाभा, राज कुमार वेर्का, संकत सिंग गिलझियान, परगत सिंग, अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुरकिरत सिंग कोटिल यांचा नव्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

यापैकी माजी मुख्यमंत्री बियंत सिंग यांचे पुत्र गुरकिरतसिंग कोटिल यांच्या नावाला शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्षानं विरोध केला होता. १९९४ साली एका फ्रेंच महिलेच्या अपहरण आणि विनयभंग प्रकरणी त्यांच्यावर खटला चालला होता. मात्र, १९९९ साली त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राणा गुरजीत सिंग हे वास्तविक माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या काळात मंत्रिमंडळात होते. मात्र, त्यांना २०१८ साली जानेवारी महिन्यात वाळू उत्खननाच्या घोटाळ्यामध्ये अडकल्यामुळे मंत्रिमंडळातून बाहेर काढलं होतं. ते पंजाबच्या सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक आहेत.

Story img Loader