पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे. विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हे व्हिडीओ लीक केल्याचा आरोप केला जात आहे. या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची दखल पंजाब महिला आयोगानेही घेतली आहे.
हेही वाचा >>> नितीशकुमार उत्तर प्रदेशातील फुलपूर येथून २०२४ ची निवडणूक लढणार? अखिलेश यादवांची मोठी ऑफर, म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार चंदीगड विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या काही विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाले आहेत. या घटनेनंतर येथे एकच खळबळ उडाली असून विद्यापीठातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीनेच आपल्या मैत्रिणींचे व्हिडीओ लीक केल्याचे म्हटले जात आहे. व्हिडीओ लीक झाल्यानंतर येथे काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय. मात्र पोलीस तसेच विद्यापीठ प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला असून कोणीही आत्महत्या केलेली नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. व्हिडीओ लीक झाल्याचे समजल्यानंतर एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा >>> चीनकडून पुन्हा दहशतवाद्यांची पाठराखण, मुंबई हल्ल्याचा सुत्रधार साजिद मीरला काळ्या यादीत टाकण्यास दर्शवला विरोध
दरम्यान, या घटनेची दखल पंजाब महिला आयोग तसेच पंजाबचे शालेय शिक्षणमंत्री हरजोत सिंग बैंस यांनी घेतली आहे. ही अतिशय गंभीर घटना असून चौकशी सुरू आहे. आरोपींना निश्चितच शिक्षा मिळेल, असे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनिषा गुलाटी यांनी सांगितले. तर गुन्हेगारांस सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शांतता बाळगावी, असे आवाहन शिक्षणमंत्री हरजो सिंग बैंस यांनी केले आहे.