पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानविरोधात आर्थिक, लष्कर किंवा राजकीय कारवाई केली जाऊ शकते असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. अमरिंदर सिंग यांनी आपल्या प्रत्येक जवानाच्या बदल्यात पाकिस्तानचे दोन मारले पाहिजेत अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानी लष्कर गोळ्या चालवत असून पंतप्रधान इम्रान खान यांचा त्यांना पाठिंबा असल्याचं स्पष्ट आहे. आपले 41 मारले गेले आहेत, आपल्याला त्यांचे 82 हवेत असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. डोळ्यांच्या बदल्यात डोळे आणि दातांच्या बदल्यात दात अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

पाकिस्तानविरोधात कशाप्रकारे कारवाई करायची हा विचार केंद्र सरकारने करण्याची गरज आहे. पण तात्काळ कारवाई केली पाहिजे. नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास सांगत असताना दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी हे वक्तव्य केलं आहे. सिद्धू एक क्रिकेटर होते आणि मी एक जवान…दोघांचा दृष्टीकोन वेगळा आहे असंही ते म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘कोणीही कोणाशी युद्ध सुरु करण्यास सांगत नाही आहे…पण जवानांची हत्या हा काही थट्टेचा विषय नाही. काहीतरी करण्याची गरज आहे. मी चिंतेत आहे…संपूर्ण देश चिंताग्रस्त आहे’. भारत सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आपलं समर्थन असेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘जर पाकिस्तानचं समर्थन असणारे दहशतवादी आपल्या जवानांची हत्या करत असतील तर आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे’, यावर अमरिंदर सिंह यांनी जोर दिला. पुलवामा दहशतवादी हल्ला गुप्तचर यंत्रणांचं अपयश असून त्यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत असंही ते म्हणाले आहेत.

Story img Loader