नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री बनले आहेत. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही बड्या पक्षांना नाकारत पंजाबच्या जनतेनं दिल्लीत सत्तेत असणाऱ्या आपच्या हाती सत्ता सोपवली. त्यामुळे अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेल्या भगवंत मान यांनी आज केलेल्या एका सूचक पोस्टमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. भगवंत मान यांनी कू अॅपवर केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा सुरू झाली असून पंजाबमध्ये आज नेमकं काय घडणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
कू अॅपवर भगवंत मान यांनी केलेल्या पोस्टमध्ये पंजाबच्या इतिहासात कधी घेतला गेला नाही, असा निर्णय आज घेणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. “पंजाबच्या हिताच्या दृष्टीने आज एक खूप मोठा निर्णय घेतला जाणार आहे. पंजाबच्या आजपर्यंतच्या इतिहासात कुणीही अशा प्रकारचा निर्णय घेतला नसेल. मी त्या निर्णयाची घोषणा लवकरच करेन”, असं या पोस्टमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे.
भगवंत मान यांनी बुधवारी शहीद भगतसिंग यांचं गाव असलेल्या खटकर कलानमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर काही वेळातच भगवंत मान यांनी “पंजाबच्या इतिहासातल्या सुवर्णकाळाला सुरुवात होत आहे”, अशी प्रतिक्रिया दिली होती. “उडता पंजाब नव्हे, बढता पंजाब”, असं देखील भगवंत मान म्हणाले होते.
पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला. पंजाब विधानसभेतील ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा दोन्ही जागांवर पराभव झाला.