Bhagwant Mann On Stubble Burning Issue : दिल्लीत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खाली आला आहे. मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजामधील शेतातील खुंट जाळत असल्याने हे प्रदुषण होत असल्याचा आरोप पुन्हा केला जातो आहे. दरम्यान, या प्रदुषणाच्या मुद्द्यावरूनच आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. भगवंत मान यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री भगवंत मान?
“शेतातील खुंट जाळण्याची समस्या केवळ एका राज्यापुरती मर्यादीत नाही. संपूर्ण उत्तर भारतात ही समस्या आहे. त्यामुळे एकट्या पंजाबला दोष देणं योग्य नाही. पंजाबमधील शेतकऱ्यांना ना शेतातील खुंट जाळण्याची इच्छा आहे, नाही धानाची शेती करण्याची इच्छा आहे. मात्र, इतर त्याच्यापुढे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना ही शेती करावी लागते”, अशी प्रतिक्रिया भगवंत मान यांनी दिली.
पंरप्रधान मोदींना लगावला टोला
पुढे बोलताना त्यांनी याच मुद्यावरून पंतप्रधान मोदींनाही टोला लगावला. “भाजपाच्या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे पंतप्रधान मोदी हे जर युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात, तर ते दिल्लीतील प्रदुषण आणि आजूबाजूच्या राज्यातील खुंट जाळण्याची समस्या दूर करू शकत नाही का? असे ते म्हणाले. तसेच पंजाबमधील धूर दिल्लीत पोहोचतो की नाही, हे मला माहिती नाही. पण या धुराचे वाईट परिणाम सर्वात आधी दिल्लीपेक्षा पंजाबमधील शेतकऱ्यांवर होतो, ज्यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाचे पीक घेतो, तेव्हा त्यांचं कौतुक केलं जातं. मात्र, ज्यावेळी खुंट कापायची वेळे तेव्हा त्यांच्यावर दंड आकारला जातो, हा एकप्रकारे अन्याय आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
© IE Online Media Services (P) Ltd