राजस्थानमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राजस्थानमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली असून कामांना सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांच्या जाहीर सभाही होत आहेत. एकीकडे देशात एक देश, एक निवडणुकीची चर्चा होत असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये निवडणुकीचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राजस्थानमध्ये ‘केजरीवाल की गॅरंटी’ हा आम आदमी पक्षाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना त्यांच्या खास शैलीत चारोळी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला!
नेमकं काय झालं?
या कार्यक्रमासाठी आम आदमी पक्षाची अनेक दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होती. यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचाही समावेश होता. भगवंत मान यांनी आपल्या भाषणामध्ये मोदी सरकारवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. महाविद्यालयांमधील वस्तीगृहांच्या शुल्कावर सरकार जीएसटी लावण्याची तयारी करत असल्याचं सांगत त्यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.
“मोदी कधीही अशी घोषणा करू शकतात की…”
“आता महाविद्यालयांमधल्या वस्तीगृहांच्या शुल्कावरही १२ टक्के जीएसटी लावण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. त्यामुळे आता मोदीजी कधीही अशी घोषणा देऊ शकतात की “ना मी शिकलो, ना इतर कुणाला शिकू देणार”, असा टोला भगवंत मान यांनी लगावला.
“मोदी स्वत: शिकले असते तर…”
“तुम्ही स्वत: जर शिकले असता तर तुम्हाला कळलं असतं की खर्च कसे होतात, कसे पूर्ण होतात, खानावळीची बिलं कशी दिली जातात. आता चौथीत तर वस्तीगृहाची गरज पडत नाही. ते कधी वस्तीगृहात राहिले असते तर समजलं असतं”, अशी टीका भगवंत मान यांनी मोदींवर केली.
“तुम्ही काम बंद करूनच दाखवा”, आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं थेट आव्हान…
“मी तर संसदेतच बोललो होतो. ते तेव्हा माझ्यासमोरच बसले होते”, असं म्हणत भगवंत मान यांनी मोदींवर एक चारोळी यावेळी ऐकवली.
“१५ लाख की रकम लिखता हूँ तो कलम रुक जाती है
काले धन के बारे में सोचता हूँ तो स्याही सूख जाती है
हर बात ही जुमला निकली..
अब तो ये भी शक है, क्या चाय बनानी आती है?”
“मला वाटत नाही त्यांना चहा बनवता येत असेल. कारण त्या काळात ते रेल्वेस्थानकच नव्हतं. हे अतीच आहे. देशाला काहीतरी सत्य सांगा. जो कुणी भाजपावाला येतो, तो जुमल्यांवरच बोलत असतो”, असं भगवंत मान यावेळी म्हणाले.