पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला सोमवारी चंदीगडच्या राजेंद्र पार्कवरून होशियारपूरला जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पीएम मोदी यांच्या दौऱ्यामुळे चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला थांबण्यास सांगण्यात आले, त्यामुळे ते होशियारपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभेला पोहोचू शकले नाहीत. यावरून काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यापासून रोखण्यात आल्यावर एका टीव्ही वाहिनीशी बोलताना सीएम चन्नी म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे थांबवणे चुकीचे आहे. जेव्हा पंतप्रधानांना लँडिंगची परवानगी मिळू शकते तर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला का नाही.” सीएम चन्नी हे होशियारपूरमध्ये राहुल गांधींसोबत निवडणूक कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते.

पीएम मोदी यांच्या दौऱ्यामुळे या भागात ‘नो फ्लाय झोन’ लागू करण्यात आल्याने मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण घेण्यापासून थांबवण्यात आले. मात्र, तत्पूर्वी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी होशियारपूरमध्ये केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि ते म्हणाले, “मुख्यमंत्री येथे येणार होते, परंतु या सरकारने चरणजीत सिंह चन्नी यांची होशियारपूरला येण्याची परवानगी रद्द केली हे लज्जास्पद आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही, तर ही निवडणूक फसवी आहे, असं मी समजेल.”

सुनील जाखड पुढे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी पंतप्रधान म्हणाले होते की, जेव्हा ते पंजाबमध्ये आले होते तेव्हा त्यांना फिरोजपूरला जाऊ दिले जात नव्हते आणि त्यांच्या जीवाला धोका होता. आज जेव्हा चरणजित सिंह चन्नी यांना होशियारपूरला येण्यापासून रोखले जात आहे, तेव्हा मी मोदी साहेबांना विनंती करतो की त्यांनी यावरही जरा प्रकाश टाकावा.”

 मोदी ५ जानेवारीला पंजाबमधील फिरोजपूर येथे रॅलीला संबोधित करणार होते. मात्र, त्यांचा ताफा हुसैनीवालाजवळील उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटे थांबला होता. यानंतर एसपीजीने पंतप्रधान मोदींचा पंजाब दौरा रद्द केला. या प्रकरणावरून अनेक दिवसांपासून देशातील राजकारण तापले होते. त्यानंतर भाजपने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेशी खेळण्याचा आरोप केला.