मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी राज्य, जिल्हा, तहसील स्तरांवरील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. चरणजीत सिंह चन्नी यांनी सोमवारी (२० सप्टेंबर) सर्व स्तरांतील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी ठीक ९ वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजार राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचसोबत, आपल्या संपूर्ण कार्यालयीन वेळेत म्हणजेच संध्याकाळपर्यंत पूर्णवेळ जनतेसाठी उपलब्ध राहण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या गरजेवर भर देत मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्राधान्याने जनतेच्या सर्व तक्रारींचं निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.


“कार्यालयीन वेळेत सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करावी. प्रशासकीय सचिव आणि विभाग प्रमुख यांनी त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, ते नियम पाहत आहेत का? हे पाहण्यासाठी आठवड्यातून दोनदा अचानक तपासणी करावी”, असे निर्देश मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी दिलं आहे. यावेळी, पंजाबच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय सचिव आणि विभाग प्रमुखांना त्यांच्या संबंधित कार्यालयातील उपक्रमांवर आणि नोंदींवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. 

मी माझं डोकं कापून टाकेन पण…!

पक्षश्रेष्ठींना आपल्या कामगिरीवर शंका असल्याने अपमानित वाटत असल्याचं सांगत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या राजकीय भूकंपानंतर, अनेक तर्क-वितर्क आणि चर्चांनंतर चरणजीत सिंग चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शपथ घेताना देखील चरणजीत सिंग चन्नी यांनी केंद्र सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली होती. यावेळी, चरणजीत सिंह चन्नी यांनी केंद्राला तीन शेतीविषयक कायदे मागे घेण्याची विनंती केली होती. “आम्हाला पंजाबला बळकट करायचं आहे. मी केंद्राला शेतीविषयक कायदे मागे घेण्याचे आवाहन करतो. मी माझं डोकं कापून टाकेन पण मी शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही”, असं चन्नी म्हणाले होते.

Story img Loader