पुढील वर्षी होणाऱ्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी शिरोमणी अकाली दलाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने हालचाल करण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे मनप्रितसिंग बादल यांनी शुक्रवारी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
शिरोमणी अकाली दलापासून फारकत घेत मनप्रितसिंग बादल यांनी २०११ मध्येच पीपल्स पार्टी ऑफ पंजाब या वेगळ्या पक्षाची स्थापना केली होती. तेव्हापासून त्यांच्यात आणि शिरोमणी अकाली दलामध्ये वाद होते. आता त्यांनी थेट काँग्रेसमध्येच आपला पक्ष विलीन केला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांनी या घटनेचे स्वागत केले असून, त्यामुळे काँग्रेसला आगामी निवडणुकीमध्ये फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीत सत्तेवर असलेला आम आदमी पक्षही पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत आहे. पक्ष या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावून उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे २०१७ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळेल.