शुक्रवारपासून राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय पातळीवरील चिंतन शिबीर सुरू आहे. या शिबिरामध्ये पक्षातील अनेक कच्चे दुवे हेरून त्यावर उपाय योजन्याचा पक्षाचा आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा प्रयत्न असणार आहे. मात्र, एकीकडे काँग्रेसचं चिंतन शिबीर सुरू असताना दुसरीकडे पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सर्वात आधी गेल्या वर्षी अमरिंदरसिंग यांचा राजीनामा, त्यानंतर पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये झालेला पराभव या दोन धक्क्यांनंतर आता पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील जाखर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी “गुडलक आणि गुडबाय” असं म्हणत पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं.

काही दिवसांपूर्वीच सुनील जाखर यांच्यावर पक्षानं शिस्तभंगाची कारवाई करत दोन वर्षांसाठी पक्षातील सर्व पदांपासून दूर राहाण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आधीच पक्षावर नाराज असलेल्या सुनील जाखर यांनी अखेर आज फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न दिल्याबद्दल जाखर पक्षावर नाराज होते. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पराभवासाठी चरणजीतसिंग चन्नी यांनाच दोषी धरलं होतं. त्यावरून पक्षानं कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.

“गुडलक आणि गुडबाय!”

“ही माझ्याकडून माझ्या पक्षासाठी भेटवस्तू असेल”, असं म्हणत “गुडलक आणि गुडबाय” असं फेसबुक लाईव्हमध्ये सुनील जाखर म्हणाले आहेत. अशा प्रकारे पहिल्यांदाच फेसबुक लाईव्हमध्ये एखाद्या ज्येष्ठ नेत्याने पक्षाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केल्याचं सांगितलं जात आहे.

“काँग्रेस पक्ष लांगुलचालन करणाऱ्यांनी घेरला गेला आहे. यामुळेच काँग्रेसचं नुकसान होत आहे. या लोकांनी देशभर राजकारण करावं, पण पंजाबला सोडून द्या. मला काँग्रेसच्या या परिस्थितीची कीव येते. हे चिंतन शिबीर फक्त एक औपचारिकता आहे. यातून फार काही हाती लागणार नाही”, असं जाखर यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे.

Story img Loader