गेल्या काही दिवसात पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. २०२२ विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली होती. मात्र दरम्यानच्या काळात यावर तोडगा निघत नसल्याचं दिसताच नवजोत सिंह सिद्धू नाराज झाले होते. तसेच आम आदमी पक्षात जाणार याबाबच्या बातम्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. मात्र आता पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर तोडगा निघाल्याचे संकेत काँग्रेस नेते हरीश रावत यांनी दिले आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी कॅप्टन अमरिंदर सिंह, तर नाराज नवजोत सिंह सिद्धू यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. तसेच दोन वर्कींग प्रेसिडेट बनवले जाणार आहेत. ते हिंदू आणि दलित समुदायातील असतील असं सांगण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असंही हरीश रावत यांनी सांगितलं.

सुनील जाखड हे सध्या पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे नवजोत सिंह सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या भांडणात त्यांचं पद जाणार आहे. पंजाबमधील वादावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी बुधवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव केसी वेणुगोपाळ, महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि प्रदेश प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. यावेळी या वादावर हा तोडगा सुचवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

दोन दिवसापूर्वी नवजोत सिंह सिद्धू यांनी आम आदमी पक्षाची स्तुती करणारं ट्वीट केलं होतं. “माझी दूरदृष्टी आणि पंजाबमधील काम आम आदमी पक्षानं ओळखलं आहे. पंजाबमधील ड्रग्स, शेतकरी, भ्रष्टाचार आणि वीज संकटाबद्दल मी २०१७ पूर्वी मुद्दा उचलला होता. आज मी पंजाब मॉडेल समोर आणतो. तेव्हा पंजाबसाठी कोण लढा देत आहे?, हे त्यांना माहिती आहे.” असं काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी सांगितलं होतं. या ट्वीटनंतर नवजोत सिंह सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार?, या चर्चांना उधाण आलं आहे. आम आदमी पक्षाचे खासदार आणि पंजाब प्रमुख भगवंत मान यांनी सोशल मीडियावरून सिद्धू यांना प्रश्न विचारला होता. “सिद्धू थर्मल प्लांटद्वारे काँग्रेसला वर्गणी दिली जात असल्याच्या मुद्द्यावर गप्प का आहेत?”, असा प्रश्न भगवंत मान यांनी विचारला होता. त्यावर नवजोत सिंह सिद्धू यांनी हे उत्तर दिलं होता.

 

Story img Loader