पंजाबमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले असून आम आदमी पक्षानं मोठा विजय मिळवल्याचं चित्र दिसू लागलं आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचे उमेदवार भगवंत मान हेच पंजाबचे पुढचे मुख्यमंत्री असतील, हे आता स्पष्ट झालं आहे. भगवंत मान हे माजी कॉमेडियन आहेत. त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर त्यांचे जुने व्हिडीओ आता व्हायरल होऊ लागले आहेत. द ग्रेट लाफ्टर चॅलेंज शो मधला त्यांचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यामध्ये भगवंत मान राजकारणावरच बोलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये समोर जज म्हणून चक्क काँग्रेसचे विद्यमान पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू दिसत आहेत.
भगवंत मान यांचा ग्रेट इंडियन लाफ्टर शोमधला एक व्हिडीओ नेटिझन्स मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. यामध्ये मान राजकारणावर स्टँडअप कॉमेडी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ २००५ मधला असल्याचं सांगितलं जात आहे.
“मी त्यांना विचारलं, राजनीती काय असते?”
या व्हिडीओमध्ये भगवंत मान किस्सा सांगताना म्हणतायत, “मैने एक नेतासे पूछा ये राजनीती क्या होती है… तो वो बोले, राज कैसे करना है, इस बात की नीती करते रहना राजनीती होता है. फिर मैने पूछा हे गौरमेंट (गव्हर्नमेंट) क्या मतलब होता है… तो वो बोला जो हर मसले पे गौर करके उसे एक मिनटमें भूल जाए, उसे केहेते है गौरमेंट!”
भगवंत मान यांचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होत असून हा सब टीव्हीवरील एका कार्यक्रमातला व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये भगवंत मान एक मंत्री म्हणून हाय कमांडशी बोलण्यासंदर्भातील एक स्कीट सादर करताना दिसत आहेत.
पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं आधीच भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यामुळे विनोदी कलाकार ते पंजाबचे मुख्यमंत्री असा भगवंत मान यांचा प्रवास दिसून आला आहे.