पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी संकेत दिले आहेत की, पुढील वर्षी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचार अभियानाची तयारी करण्यासाठी निवडणूक राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पाचारण केलं जाऊ शकतं.

काँग्रेसच्या बैठकीच्या एका छोट्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री चन्नी हे सांगताना दिसून येते की, हरीश चौधरी देखील प्रशांत किशोर यांची सेवा घेण्याचा सल्ला देत आहेत. तसेच, चन्नी त्यांच्या सरकारकडून अशातच घेण्यात आलेल्या वीज दर कमी करण्याच्या निर्णयाबाबत आणि यावर लोकांच्या कशाप्रकारे सकारात्मक प्रतिक्रिया आल्या, यावर देखील चर्चा करताना व्हिडिओत दिसून आले आहे. चन्नी म्हणाले की लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

त्यांनी म्हटले की, आपल्या सर्वांच्या सुचनानुसार वीज दर कमी करण्यात आले आहेत. आपल्याकडे आता काही महिने शिल्लक(निवडणूक आचारसंहिता लागू होण्याअगोदर) आणि तुम्ही ज्या काही सूचना कराल, त्यावर अमलबजावणी होईल याची मी खात्री करेन.

या वर्षाच्या सुरूवातीस प्रशांत किशोर यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या मुख्य सल्लागार पदाचा राजीनामा दिला होता. प्रशांत किशोर सध्या आगामी गोवा विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेससाठी नियोजन करत आहेत. या अगोदर प्रशांत किशोर यांनी २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत अमरिंदर सिंह यांच्या प्रचार अभियानाची जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर काँग्रेस मोठ्या बहुमताने विजयी होत सत्तेत आली होती.

Story img Loader