पंजाबमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवाळ्यात डिसेंबरमध्ये वीजेची मागणी वाढली आहे. या क्षेत्रातील जाणकार राज्यामध्ये पहिले ३०० यूनिट मोफत वीज देण्याचं धोरण यासाठी कारणीभूत असल्याचं सांगतात. सरकारी आकडेवारीनुसार मागील दोन महिन्यांमध्ये राज्यातील ९१ टक्के लोकांनी या मोफत यूनिटच्या मर्यादेतच वीज वापरल्याने विजेची बिलं शून्य रुपये आहेत. मागील वर्षी ३ डिसेंबर रोजी जितकी विजेची मागणी होती त्यापेक्षा यंदा ही मागणी १९ टक्क्यांनी वाढली आहे. मागील वर्षी विजेचा वापर ६ हजार ३३ मेगावॅट इतका होता. यंदा हा वापर ७ हजार १५६ मेगाव्हॅट इतका आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार मागील वर्षाशी तुलना केल्यास १ डिसेंबर रोजी विजेचा वापर हा ७ हजार २०५ मेगावॅट इतकी होती. हीच मागणी मागील वर्षी ६ हजार १७० मेगावॅट इतकी होती. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १७ टक्के अधिक वाढ नोंदवण्यात आली. २ डिसेंबर रोजी विजेची मागणी ६ हजार ७७१ मेगावॅट इतकी होती जी आधीपेक्षा १३ टक्के अधिक आहे. याचप्रमाणे ७ डिसेंबर रोजी मागील वर्षी ६ हजार ८९३ मेगावॅट वीज वापरली गेली. हाच आकडा यंदा ७ हजार ७८३ मेगावॅट इतका म्हणजेच १३ टक्के अधिक आहे.
२४ डिसेंबर रोजी मागणी वाढून यंदा ८ हजार ८ मेगावॅट वीज वापरली गेली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा १८ टक्क्यांनी अधिक असून मागील वर्षी याच दिवाशी ६ हजार ७८९ मेगावॅट विजेचा वापर झाला. १५ डिसेंबर रोजी एकूण ७ हजार २३९ विजेचा वापर झाला. मागील वर्षी हीच आकडेवारी ६ हजार ४६० मेगावॅट इतकी म्हणजे आतापेक्षा १२ टक्के कमी होता.
केवळ दोन दिवस १८ आणि २० डिसेंबर रोजी पंजाबमध्ये मागील वर्षापेक्षा यंदा कमी वीज वापरण्यात आली. दोन्ही दिवशी मागणी मागील वर्षाच्या तुलनेत चार टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी १८ डिसेंबरला ७ हजार २०४ मेगावॅट वीज वापरली गेली तर यंदा ही आकडेवारी ६ हजार ९५१ मेगावॅट इतकी होती. २० डिसेंबर रोजी मागील वर्षी ६ हजार ८८९ मेगावॅट वीज वापरली गेली होती यंदा हा आकडा ६ हजार ५९६ इतका आहे.
वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विजेच्या मागणीमध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली तरी त्याला मोठी मागणी आहे असं म्हणत नाही. मात्र एखाद्या दिवशी अचानक १९ टक्के वाढ असेल तर मागणी अधिक असल्याचं म्हटलं जातं. यावरुन ज्या लोकांना ३०० यूनिटपर्यंत मोफत वीज दिली जात आहे त्यांच्याकडून वापर वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सरकारने जुलैपासून ३०० यूनिट मोफत वीज देण्याचा निर्णय लागू केला आहे.