लाहोर येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंजणारा भारतीय कैदी सरबजित सिंग याला आता माणुसकीदाखल भारतात पाठविण्यात यावे, अशी मागणी पंजाबचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री अदाईश प्रताप सिंग कैरॉन यांनी केली. दरम्यान, सरबजित मृत्यूच्या दाढेतून बाहेर यावा यासाठी देशभरात प्रार्थना केल्या जात आहेत.
कोमामध्ये असलेल्या भारताच्या सरबजितबद्दल पाकिस्तानने थोडी तरी माणुसकी दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत योग्य आणि अधिक उत्तम उपचार मिळावेत यासाठी सरबजितला भारतात पाठविण्यात यावे, असे कैरॉन म्हणाले. पाकिस्तानने अशी माणुसकी दाखविल्यास त्यामुळे उभयपक्षीय संबंध सुधारण्यास मदतच होईल, असेही कैरॉन यांनी सुचविले. सरबजितची सुटका करण्यासाठी भारत सरकारनेही अधिकाधिक प्रयत्न करावेत, अशी विनंतीही कैरॉन यांनी केली.