पंजाबमध्ये बुधवारी बादल कुटुंबीयांच्या मालकीच्या बससेवेतील बसमध्ये एक आई व तिच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यात मुलीला बाहेर फेकल्याने मुलीचा मृत्यू झाला, त्यावर पंजाबचे शिक्षण मंत्री सुरजितसिंग राखरा यांनी त्या मुलीचे मरण ही देवाचीच इच्छा होती असे निलाजरे वक्तव्य केले आहे. असे अपघात कुणीच टाळू शकत नाही कारण जे घडते ते देवाच्या इच्छेनुसार घडते असे ते म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी ऑर्बिट कंपनीच्या बसगाडय़ा तूर्त रस्त्यावर धावणार नाहीत अशी घोषणा केली असून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल असे सांगितले.
आपल्या आयुष्यात अपघात होऊ शकतात, जे घडले ते दुर्दैवी होते पण आपण निसर्गाच्या इच्छेविरूद्ध जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले. मुलीच्या नातेवाईकांनी सरकारची नुकसानभरपाई नाकारली असून वाहन मालकांवर कारवाईची मागणी केली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी त्याशिवाय मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. मोगाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जतिंदर सिंग खेहरा यांनी सांगितले की, अंत्यसंस्काराच्या मुद्दय़ावर तोडगा निघालेला नाही. मुलीचा मृतदेह सिंघावाला खेडय़ातील शवागारात ठेवला असून राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांचे मन वळवण्याचे केलेले प्रयत्न फसले आहेत. त्यांनी सरकारने देऊ केलेली भरपाई नाकारली आहे, तिच्या आईला सरकारी नोकरी व मोफत उपचार देण्याचीही तयारी सरकारने दर्शवली तसेच वेगाने खटला चालवण्याचेही आश्वासन दिले.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन
पंजाबमधील ढासळलेली कायदा – सुव्यवस्था आणि गहू खरेदीस होणारा विलंब याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या वतीने शनिवारी राज्याच्या विविध भागांत काँग्रेसच्या वतीने ‘रेलरोको’ आंदोलन करण्यात आल्याने अनेक गाडय़ा विलंबाने धावत होत्या. प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांच्या नेतृत्वाखाली सिरहिंद येथे ‘रेलरोको’ करण्यात आला.

सुखबीर बादल यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, त्यांच्याविरोधात कुणीच एफआयआर दाखल करू शकत नाही असे कसे होऊ शकते?
– ‘त्या’ मुलीचे वडील

Story img Loader