नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकातून भारतात आणण्यास गेलेले विविध यंत्रणांचे पथक जवळपास एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर चोक्सी याला न घेताच कतार एअरवेजच्या खासगी विमानाने मायदेशी येण्यास निघाले आहे.
डॉमिनिकातील उच्च न्यायालयाने चोक्सी याच्या हेबियस कॉर्पस याचिकेवरील सुनावणी तहकूब केल्यानंतर हे पथक तेथून निघाले आहे. डॉमिनिकातील मेलविल हॉल विमानतळावरून खासगी विमानाने उड्डाण केले असून ते माद्रिदच्या दिशेने रवाना झाले आहे. विविध यंत्रणांचे पथकही भारतात परतत आहे. सीबीआयच्या उपमहानिरीक्षक शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चोक्सी याला परत आणण्यासाठी सात दिवस प्रतीक्षा केली. चोक्सी याच्या हेबियस कॉर्पस याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.