उन्हाची काहिली शमविण्यासाठी अनेक नागरिक हातगाडय़ांवरील लिंबू सरबत, लिंबू पाणी पिताना दिसतात. मात्र लिंबाचे भाव गगनाला भिडल्याने हातगाडीवरील थंड पेयांतून लिंबू सरबत जणू हद्दपारच झाले आहे. जिथे आहे, तिथे प्रचंड महाग असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे. असं असताना पंजाबमध्ये लिंबू घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी कपूरथला मॉडर्न जेलचे अधीक्षक गुरनाम लाल यांना निलंबित करण्यात आले आहे. कारागृह मंत्री हरजोत बैस यांच्या आदेशानुसार कारागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण ५० किलो लिंबाच्या खरेदीशी संबंधित आहे. कारागृहातील लिंबू घोटाळ्यामुळे तुरुंगमंत्री हरजोत बैंस यांच्या आदेशानुसार एडीजीपी कारागृह वरिंदर कुमार यांनी गुरनाम लाल यांना निलंबित केले आहे. कारागृह अधीक्षकांनी रेशन खरेदीमध्ये ५० किलो लिंबू दाखवले होते, तेव्हा बाजारात लिंबाचा भाव २०० रुपयांपेक्षा जास्त होता. मात्र, त्या कैद्यांनाही हे लिंबू मिळाले नाहीत.
चौकशीसाठी समिती पोहोचल्यावर त्याचं बिंग फुटलं. त्यावेळी कैद्यांनी लिंबू मिळत नसल्याचे सांगितले. देशात लिंबूचे भाव गगनाला भिडलेले असताना १५ ते ३० एप्रिलदरम्यान लिंबू खरेदी दाखवण्यात आली. या प्रकरणातील तपासादरम्यान गैरव्यवहारासह अनेक गैरप्रकारही समोर आले आहेत. पीठातही गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
कारागृह अधिकारी वीरेंद्र कुमार म्हणाले, “कारागृहातील कैद्यांना योग्य आहार देण्याच्या अनियमिततेसाठी कारागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. डीआयजीच्या नेतृत्वाखालील एका पथकाने या अनियमिततेची चौकशी केली होती, ज्यामध्ये असे आढळून आले की कपूरथळा कारागृहातील कैद्यांना निर्धारित नियमांनुसार योग्य आहार दिला जात नाही. नोंदीनुसार, कैद्यांसाठी लिंबूही मागविण्यात आले होते, परंतु ते सापडले नाहीत.”
तुरुंग अधिकाऱ्याने 50 किलो लिंबू खरेदी केल्याचे दाखवले होते मात्र, लिंबू स्वयंपाकघरात वापरले जात नसल्याचं कैद्यांनी सांगितलं. बाजारात लिंबाचा भाव २०० रुपये किलोपेक्षा जास्त असताना हे लिंबू खरेदी करण्यात आले. त्यावेळी देशात लिंबाच्या किमतीवरून गदारोळ झाला होता. तसेच अनेक ठिकाणी बाजारातून लिंबू चोरीला गेल्याच्या बातम्याही आल्या होत्या.