पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासाठी अनेक माध्यमांनी ‘दलित’ या शब्दाचा वापर केला. याचीच गंभीर दखल घेत आता पंजाब राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाने मंगळवारी (२१ सप्टेंबर) अनुसूचित जातीच्या कोणत्याही व्यक्तीसाठी हा शब्द न वापरण्याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
आयोगाचे अध्यक्ष तेजिंदर कौर यांनी सांगितलं की, ‘दलित’ शब्दाचा उल्लेख घटनेत किंवा कोणत्याही कायद्यात नाही. याशिवाय, भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना यापूर्वीच याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचं देखील त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या २०१८ च्या आदेशाचा संदर्भ देत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या व्यक्तींसाठी ‘दलित’ हा शब्द वापरण्यास मनाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘दलित’ ऐवजी ‘अनुसूचित जाती’ हा शब्द योग्य
तेजिंदर कौर पुढे म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना अनुसूचित जातीच्या व्यक्तींसाठी ‘दलित’ ऐवजी ‘अनुसूचित जाती’ हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले होते.
मुख्य सचिव विनी महाजन यांना लिहिलेल्या पत्रात १३ सप्टेंबर रोजी कौर यांनी काही गावांची, शहरांची आणि इतर ठिकाणांची नावं बदलण्याची शिफारस केली होती. ही नावं सध्या जातींच्या आधारावर आहेत.