पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि त्यांच्या मातोश्रींचा मृतदेह शनिवारी दुपारी राहत्या घरात सापडला. या दोघांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. या घटनेचा पंजाबमध्ये सर्वच स्तरातून निषेध होत असून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनीदेखील या घटनेचा निषेध केला आहे.

मोहालीतील फेज ३ बी २ येथे के जे सिंग हे त्यांच्या मातोश्री गुरचरन कौर यांच्यासह राहत होते. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास राहत्या घरी दोघांचा मृतदेह सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. दोघांच्या गळ्यावर वार केल्याचे दिसते. त्यामुळे ही हत्या असू शकते असे पोलिसांनी सांगितले. सिंग यांच्या घरातून काही मौल्यवान दागिने आणि घरासमोरील कार गायब असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे. पंजाब पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमणार असल्याची घोषणा केली.

सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या चंदिगड आवृत्तीचे संपादक म्हणून काम केले होते. याशिवाय अन्य ख्यातनाम वृत्तपत्रांच्या चंदिगडमधील आवृत्तीच्या ते संपादकपदी होते. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनी या घटनेचा निषेध केला. ‘मी या घटनेचा निषेध करतो, पोलिसांनी दोषींना तात्काळ अटक करावी’ अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकाराची हत्या होण्याची गेल्या महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी कर्नाटकात गौरी लंकेश यांची आणि त्रिपुरामध्ये शंतनू भौमिक या पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश या  बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक होत्या. तर त्रिपुरातील मंडाई येथे त्रिपुरा स्वदेशी जनता आघाडी आणि सत्ताधारी माकपप्रणित त्रिपुरा राज्य उपजाती गणमुक्ती या संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या चकमकीचे वृत्तांकन करत असताना भौमिकची हत्या करण्यात आली.

Story img Loader