पंजाब काँग्रेसमधील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंह सिद्धू यांची वर्णी लागल्यानंतर प्रकरण शमेल अशी शक्यता होती. मात्र प्रकरण शमण्याऐवजी आणखी तीव्र होत असल्याचं दिसत आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांच्या सल्लागारावरून पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी सिद्धू यांना सल्लागारांना पदावरून काढण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर आज सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर माली यांनी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला.

“काश्मीर हा काश्मिरी लोकांचा देश आहे. १९४७ मध्ये ब्रिटिशांनी भारत सोडत केलेल्या कराराचा आणि यूएनओच्या निर्णयाचं उल्लंघन करत काश्मीरचे दोन तुकडे केले. यावर पाकिस्तान आणि भारताने ताबा मिळवला”, असं वादग्रस्त विधान मालविंदर सिंह माली यांनी केलं होतं. त्यानंतर मालविंदर सिंग यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोत इंदिरा गांधी मानवी कवट्यांच्या ढिगावर हातात बंदूक घेऊन उभ्या आहेत तर त्यांच्या बंदुकीच्या टोकावर एक कवटी अडकवलेली दिसत आहे. हे चित्र पंजाबमधल्या जनतक पैगाम या मासिकाच्या जून १९८९ च्या अंकाचं मुखपृष्ठ होतं. ह्या मासिकाचे संपादक त्यावेळी मालविंदर सिंग माली होते. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता.

यापूर्वीही माली यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर राज्यात जातीय तणाव पसरवत असल्याचा आरोप केला होता. पंजाबच्या राजकारणात माली यांची गणना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे कट्टर विरोधक म्हणून केली जाते.

दुसरीकडे नवज्योत सिंह सिद्धू यांनी अमृतसरमध्ये व्यापाऱ्यांना संबोधित करताना सरकारला इशारा दिला. “जर निर्णय घेऊ दिले नाही. टाळीला टाळी वाजणार.”, असा दमच त्यांनी यावेळी भरला.

Story img Loader