लहान मुलं असलेल्या पालकांना काळजीत टाकणारी एक बातमी समोर आली आहे. अनेकजण लहान मुलांना दुकानातून खाऊ घेऊन देताना त्यावरील माहिती वाचत नाहीत. पण हा निष्काळजीपणा जीवावरही बेतू शकतो. पंजाबमध्ये असाच एक गंभीर प्रकार घडला आहे. एका दीड वर्षांच्या मुलीने कालबाह्य झालेले चॉकलेट खाल्ल्यानंतर तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंजाबच्या पटियाला येथील एका किराणा दुकानातून सदर चॉकलेट खरेदी करण्यात आले होते. या प्रकरणानंतर पोलीस आणि आरोग्य विभागाने एकत्रित केलेल्या चौकशीत सदर चौकलेट कालबाह्य (एक्सपायर) झाल्याचे निदर्शनास आले.
मुळचे लुधियानाचे असलेले मुलीचे कुटुंबीय पटियाला येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले होते. नातेवाईक असलेल्या विकी गेहलोत यांनी जवळच्या किरणा दुकानातून एक चॉकलेटचा बॉक्स आणून लहान मुलीला दिला होता. घरी आल्यानंतर मुलीने बॉक्समधील चॉकलेट खाल्ले असता तिच्या तोंडातून रस्तस्त्राव व्हायला लागला. यानंतर तिला तात्काळ जवळच्या ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विषारी तत्व असलेले चॉकलेट खाल्ल्यामुळे रक्ताच्या उलट्या झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून निष्पन्न झाले.
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू
या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने तक्रारदारासह किराणा दुकानात धडक दिली आणि चॉकलेटचे नमुने गोळा केले. सदर दुकानदाराने कालबाह्य झालेले पदार्थ विकले असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळून आले. दुकानातील इतर कालबाह्य झालेला मालही जप्त करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.
मागच्या महिन्यातही पटियालामध्ये १० वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाच्या दिवशी केक खाल्ल्यामुळे मृत्यू झाला होता. तसेच तिच्या कुटुंबातील इतर सदस्यही या केकमुळे आजारी पडले होते. कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर कळले की, ज्या बेकरीने सदर केक तयार केला होता, ती नोंदणीकृत नव्हती. खोट्या नावाने अवैधपणे ते व्यवसाय करत होते. मृत मुलीने ऑनलाईन मागवलेला केक शिळा असल्याचे तपासणीत उघड झाले होते.